नसबंदी करूनही संख्या नियंत्रणात येतच नाही; पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी ३ ठिकाणी शेल्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:33 IST2026-02-28T12:32:46+5:302026-02-28T12:33:04+5:30

नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नसबंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे

Even after sterilization, the number is not under control; 3 shelters for stray dogs in Pune city | नसबंदी करूनही संख्या नियंत्रणात येतच नाही; पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी ३ ठिकाणी शेल्टर

नसबंदी करूनही संख्या नियंत्रणात येतच नाही; पुणे शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी ३ ठिकाणी शेल्टर

पुणे: नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात खराडी, शिंदेवाडी आणि भूगाव येथे कुत्र्यांसाठी शेल्टर (निवारा केंद्र) उभारण्यात येत आहेत. या शेल्टरमध्ये प्रत्येकी एक हजार कुत्र्यांना ठेवता येणार असून, भूगाव येथील शेल्टरचे काम ४० टक्के झाल्याची माहिती महापालिकेच्या पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या कुत्र्यांचा सर्वाधिक त्रास रात्री उशिरा कामावरून घरी जाणाऱ्या आणि पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेकडून कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. या कामासाठी वेगवेगळ्या संस्थांची नियुक्ती केली जाते.

कुत्र्यांच्या नसबंदीवर महापालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. तसेच नसबंदी केल्यानंतर गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांनाही पिले होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे नसबंदी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. पूर्वी भटक्या कुत्र्यांना धोका रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी जास्त असायचा, मात्र मागील काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांकडून दिवसाही नागरिकांवर हल्ले होत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक संस्थांना भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, महापालिकेकडून खराडी, शिंदेवाडी आणि भूगाव येथे कुत्र्यांसाठी सेल्टर (निवारा केंद्र) उभारण्यात येत आहेत.

भटक्या कुत्र्यांसाठी २५ कोटींच्या निधीची मागणी

शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी तीन ठिकाणी सेल्टर बांधण्याचे काम सुरू असून, त्याची क्षमता तीन हजार आहे. राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका भटक्या कुत्र्यासाठी दररोज अन्न, पाणी आणि स्वच्छतेचा अंदाजे खर्च १०३ रुपये आहे. भटक्या कुत्र्यांचे अन्न, वैद्यकीय उपचार आणि देखभालीचा खर्च पाहता भटक्या कुत्र्यांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये २५ कोटीच्या निधीची तरतूद करावी, असा प्रस्ताव देण्यात आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title : नसबंदी बेअसर, पुणे में आवारा कुत्तों के लिए 3 आश्रय स्थल निर्मित।

Web Summary : नसबंदी के बावजूद, पुणे आवारा कुत्तों की आबादी से जूझ रहा है। 3,000 कुत्तों को आश्रय देने के लिए खराडी, शिंदेवाड़ी और भूगांव में आश्रय बनाए जा रहे हैं। भूगांव आश्रय 40% पूरा हो गया है। उनकी देखभाल के लिए 25 करोड़ रुपये का प्रस्ताव अनुरोध किया गया है।

Web Title : Sterilization ineffective, Pune builds shelters for stray dogs at 3 locations.

Web Summary : Despite sterilization efforts, Pune struggles with stray dog population. Shelters are being built in Kharadi, Shindewadi, and Bhugaon to house 3,000 dogs. The Bhugaon shelter is 40% complete. A proposal for 25 crore rupees is requested for their care.