पुणे : भगतसिंग यांनी महाविद्यालयीन वयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला, सभागृहात आवाज उठवला. तरुण वयात शेतमालाच्या हमी भावाबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष केला. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी लढा सुरू आहे. मात्र आज शंभर वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर अधिक जटिल झाले आहेत. आजही विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, याची कुणालाही लाज वाटत नाही. आज घराघरात भगतसिंग उदयाला यायला हवा, शेतकरी ज्या दिवशी सुखी होईल त्या दिवशी त्यांचा लढा खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, असे प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केले.
सरहद संस्था व कृष्णा पब्लिकेशनच्या वतीने आयोजित ‘युगद्रष्टा भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार-२०२६’ व भगतसिंगांच्या जीवनावरील ‘युगद्रष्टा भगतसिंग’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. टिळक रोड येथील आयएमएच्या डॉ. के. एच. संचेती सभागृहात शुक्रवारी (दि. २१) आयोजित समारंभास हुतात्मा भगतसिंग यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंग, मायदेश फाउंडेशनचे संस्थापक अरुण जोशी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार, केतन पुरी, सत्यशील राजगुरू, प्रकाशक चेतन कोळी, अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळीत ज्यांचा आदर्श घेऊन उतरलो त्या भगतसिंगांच्या नावाने मिळत असलेला पुरस्कार हा खूप मोठा सन्मान आहे. मला खात्री आहे की, मी त्या काळात असतो तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांच्या सोबत काम केले असते, मलाही कशाची भीती वाटत नाही.संजय नहार म्हणाले, शालेय जीवनात शिकविलेला भगतसिंग वेगळा होता, प्रत्यक्षात साहित्यातून अनुभवलेला भगतसिंग वेगळा आहे. अरुण जोशी यांनी भगतसिंग यांच्या जीवनावरील पुस्तकाचे मराठीत भाषांतर तरुणांसाठी उत्साहवर्धक आहे. भगतसिंगांच्या परिवाराचे योगदान किती मोठे आहे, हे या पुस्तकातून समजते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढताना माझ्यावरही अनेक हल्ले झाले. आजही साम, दाम, दंड, भेदाचा वापर होत आहे. संघटना फोडून चळवळ कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर अनेकदा अव्यवहार्य असल्याची टीका होते. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतच राहणार आहे. पैसे देऊन मत मागण्याइतका मी दरिद्री नाही. काही वर्षांपासून सभागृहात नाही म्हणून माझं काम थांबले नाही. शेतकऱ्यांच्या तत्त्वासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार. - राजू शेट्टी, शेतकरी नेते.
Web Summary : Raju Shetti lamented that farmers' problems persist even after a century, leading to suicides. Speaking at an event honoring Bhagat Singh, he emphasized the need for farmers' prosperity and continued struggle for their rights. He highlighted the importance of farmers' movements and principles.
Web Summary : राजू शेट्टी ने दुख जताया कि किसानों की समस्याएँ एक सदी बाद भी बनी हुई हैं, जिससे आत्महत्याएँ हो रही हैं। भगत सिंह को सम्मानित करने वाले एक कार्यक्रम में बोलते हुए, उन्होंने किसानों की समृद्धि और उनके अधिकारों के लिए निरंतर संघर्ष की आवश्यकता पर जोर दिया। उन्होंने किसान आंदोलनों और सिद्धांतों के महत्व पर प्रकाश डाला।