२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके
By नितीश गोवंडे | Updated: February 27, 2025 19:17 IST2025-02-27T19:17:11+5:302025-02-27T19:17:53+5:30
घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

२ दिवस उलटूनही पोलिसांचे हात रिकामेच; आरोपी गाडेच्या शोधासाठी ड्रोन, डॉगस्कॉड अन् १३ पथके
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणेपोलिसांची १३ पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच डॉगस्कॉड, ड्रोनच्या साहाय्यानेही आरोपीची शोधमोहीम सुरु आहे. घटनेच्या दोन दिवसांनंतरही पोलिसांना आरोपी न सापडल्याने, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील गुन्हे रोखण्यास गेल्या काही महिन्यांपासून गुन्हे शाखा कमी पडत असल्याचे देखील अन्य प्रकरणांवरून दिसून येत आहे.
पोलिसांकडून बुधवारी रात्री दत्तात्रयच्या मित्र-मैत्रिणींची, आई-वडिलांची चौकशी करण्यात आली. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराईताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. परगावी निघालेल्या तरुणीवर सराईताने बलात्कार केला. याप्रकरणी दत्तात्रय रामदास गाडे (३५, रा. गुनाट, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत २६ वर्षीय पीडितेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गाडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने त्याला पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती असल्याने तो पोलिसांना गुंगारा देत असल्याची चर्चा गुरूवारी शहरात होती.
गाडे पसार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत. गाडेच्या संपर्कात असलेल्या दहा मित्रांची पोलिसांनी चौकशी पोलिसांनी बुधवारी रात्री केली. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून गाडेचा शोध घेण्यात येत आहे. गाडेच्या आई-वडील आणि भावाची चौकशी देखील पोलिसांनी केली.
मैत्रीण चौकशीसाठी ताब्यात..
गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली. चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाईल क्रमांक मागितले होते. त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे. गाडेने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
एसटी बसची फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून तपासणी..
आरोपी गाडेचा स्वारगेट एसटी स्थानकात वावर असायचा. तो कधी पोलिस तर कधी कंडक्टर असल्याची बतावणी करायचा. मंगळवारी सकाळी परगावी निघालेल्या तरूणीला त्याने कंडक्टर असल्याची बतावणी केली. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची फॉरेन्सिक एक्सपर्टकडून गुरूवारी तपासणी करण्यात आली. त्यासाठी बस फॉरेन्सिकच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. संबंधित बस चालकाचा देखील पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे.