सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:55 IST2025-10-14T09:55:02+5:302025-10-14T09:55:27+5:30
पुणे पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावर बनावट गुन्हे दाखल केले

सर्च वॉरंट नसताना घरात घुसले; झडती घेतली, कुटुंबियांना धमकावलं, घायवळचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
पुणे : कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घायवळने मुंबई उच्च न्यायालयात रीट पीटिशन दाखल केली असून या याचिकेवर आज दुपारी १२.३० वाजता सुनावणी होणार आहे. या याचिकेत घायवळने पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत स्वतःचा कोणत्याही टोळीशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.
रीट पीटिशनमध्ये घायवळने नमूद केलं आहे की, तो कोणतीही टोळी चालवत नाही, आणि कोथरूड गोळीबार प्रकरणात त्याचं नाव पोलिसांनी आणि माध्यमांनी हेतुपुरस्सर जोडल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मिडिया ट्रायलमुळे आपली प्रतिमा खराब झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. याचिकेत पुढे नमूद केलं आहे की, ९ तारखेला घायवळ परदेशात होता, तर गोळीबाराची घटना १७ तारखेला घडली. त्यामुळे त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. पुणे पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी बनावट गुन्हे दाखल केले. घायवळला चुकीच्या पद्धतीने टोळी प्रमुख दाखवण्यात आलं, तसेच सर्च वॉरंट नसताना पोलिसांनी घरात घुसून झडती घेतली आणि कुटुंबियांना धमकावलं, असा गंभीर आरोप देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचे घायवळ टोळीशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. धंगेकर यांनी पाटील यांनी या प्रकरणावर खुलासा करावा अशी मागणी केली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या या संपूर्ण घडामोडीमुळे पुण्यातील गुंडगिरी आणि राजकीय संबंधांवर नवा वाद पेटला असून, काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.