बुधवार पेठेत चोरी करणारा अभियांत्रिकीचा टॉपर; पावणे ५ लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 20:18 IST2025-07-18T20:18:30+5:302025-07-18T20:18:58+5:30
तरुण सराईत गुन्हेगार नसून, अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्याने आर्थिक अडचणीमुळे हे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे

बुधवार पेठेत चोरी करणारा अभियांत्रिकीचा टॉपर; पावणे ५ लाखांचे दागिने चोरून कर्नाटकला गेला पळून
पुणे : शहरातील बुधवार पेठ परिसरातील एका ज्वेलरी शॉपमधून दागिने चोरीला गेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातून अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार नसून, अभियांत्रिकीचा टॉपर असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच त्याने आर्थिक अडचणीमुळे हे कृत्य केल्याची बाब समोर आली आहे. लिखित जी (२१, रा. कोलार, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी मध्यरात्री पाऊण ते सव्वा वाजेदरम्यान, एका २० ते २५ वर्षीय तरुणाने दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाथरूमच्या खिडकीद्वारे ज्वेलरी शॉपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने ४ लाख ७४ हजार रुपयांची ज्वेलरी चोरून नेली. चोरी करताना आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट, जीन्स पँट आणि काळ्या रंगाचा मास्क घातला होता. त्याच्या पाठीवर एक बॅग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते. दुकानमालकाला दुसऱ्या दिवशी ही बाब समजल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश उसगावकर आणि त्यांची टीम याप्रकरणाचा तपास करत होती. पोलिस पथकाने सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेज तपासत, तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील जंगमगुर्जनहल्ली या गावच रहिवासीअसल्याचे समजले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक, आरोपीच्या घरी पोहोचले. त्याच्या घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाईलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. लगातार ४ दिवस पाळत ठेवून, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीवर लक्ष ठेवण्यात आले. अखेर बुधवारी (दि. १६)
आरोपीला गांधीनगर, कोलार येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. लिखित जी याला न्यायालयात हजर केले असता, १९ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.