पुणे पुस्तक महाेत्सवात साडेआठ लाख पुस्तकांची विक्री; ११ काेटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:48 AM2023-12-25T09:48:05+5:302023-12-25T09:48:34+5:30

तब्बल ४.५ लाख नागरिकांचा महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चळवळीला पाठिंबा

Eight and a half lakh books sold at Pune Book Festival 11 crore turnover | पुणे पुस्तक महाेत्सवात साडेआठ लाख पुस्तकांची विक्री; ११ काेटींची उलाढाल

पुणे पुस्तक महाेत्सवात साडेआठ लाख पुस्तकांची विक्री; ११ काेटींची उलाढाल

पुणे : नॅशनल बुक ट्रस्टतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात ८.५० लाख पुस्तकांची विक्री झाली आहे. तब्बल ४.५ लाख नागरिकांनी महोत्सवाला भेट देत वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चळवळीला पाठिंबा दिला. महोत्सवात पुस्तक विक्रीतून साधारण ११ कोटींची आर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती महाेत्सवाचे संयाेजक राजेश पांडे यांनी दिली.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाची रविवारी सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदीं मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाला भेट देणाऱ्या आणि पुस्तकांची खरेदी करणाऱ्यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती. महाेत्सवाच्या शेवटच्या दिवशी (रविवारी) दि. २४ राेजी पुणेकरांनी स्टाॅल्सवर पुस्तके विकत घेण्यासाठी माेठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, दिल्लीतील प्रगती मैदानावर ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सव होणार आहे. या महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवाचे एक दालन राहणार आहे. या दालनातून पुणे पुस्तक महोत्सवाविषयी माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे पुणे पुस्तक महोत्सवाच्या प्रसार-प्रचारासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी माहिती एनबीटी अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी सांगितले.

पुढील वर्षीही पुस्तक महाेत्सव

पुणेकरांनी पुस्तक महाेत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार. शहरातील वाचनसंस्कृती, तसेच वाचन चळवळ अशीच वृद्धिंगत व्हावी यासाठी पुढील वर्षीही डिसेंबर महिन्यात पुणे पुस्तक महाेत्सवाचे आयाेजन करण्यात येणार आहे. - राजेश पांडे, संयाेजक, पुणे पुस्तक महाेत्सव

Web Title: Eight and a half lakh books sold at Pune Book Festival 11 crore turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.