छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:51 PM2022-05-07T12:51:27+5:302022-05-07T13:21:38+5:30

पुण्याची ही ओळख होण्यामागे राजर्षी शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे...

due to Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Pune became the home of education | छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे पुणे बनले विद्येचे माहेरघर

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याचा जगभरात लौकिक आहे. पुण्याची ही ओळख होण्यामागे राजर्षी शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे. कोल्हापुरात नाहीत तेवढ्या शिक्षण संस्था शाहू महाराजांनी पुण्यात सुरू करून दिल्या, त्याचे ते मुख्य देणगीदार सिंहाचा वाटा आहे.

शाहू चरित्राचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी मरियम स्कूलच्या आवारातील हा पुतळा प्रत्यक्षात बसला गेला, त्यावेळी शाहू महाराज हयात नव्हते, मात्र त्या पुतळ्याच्या चौथऱ्याची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटी या प्रसिद्ध शिक्षण संस्थेसह, श्री शिवाजी मराठा सोसायटी, शाहू शिक्षण संस्था अशा अनेक संस्था शाहू महाराजांनी पुण्यात सुरू करून दिल्या. त्यासाठी या संस्थांना त्यांनी त्या काळात मोठ्या देणग्या दिल्या. त्यांचे ते प्रमुख आश्रयदाते झाले. या संस्थांना शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, यासाठी जागा मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांचे प्रयत्न आहेत.

महाराज सांगतात म्हणून अनेक सरदार घराण्यातील अनेक वंशजांनी आपल्या मालकीच्या जागा संस्थांना दिल्या. फर्ग्युसन महाविद्यालयाची जागाही शिरोळे यांच्याकडून शाहू महाराजांनीच डेक्कन एज्युकेशन संस्थेला मिळवून दिली. आज या बहुतेक संस्थांचा मोठा वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या अनेक शाखा पुण्यात झाल्या. लाखो विद्यार्थी विद्यार्थी तिथे शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत झाले, होत आहेत.

शाहू महाराजांच्या वंशजांना आजही या संस्थांच्या कार्यकारिणीवर सन्मानाचे स्थान आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. कोल्हापुरातून शाहू महाराज पुण्यात वारंवार येत असत. कॅम्पमधील कोल्हापूर लॉज या इमारतीत त्यांचा मुक्काम असे. पुण्यात त्यांचे जेधे बंधू म्हस्के, दिनकरराव जवळकर, गणपतराव कदम असे १०० पेक्षा जास्त स्नेही होते. केशवराव जेधे, बाबूराव जेधे या जेधे बंधूंबरोबर त्यांचे सख्य असे. त्यांच्या जेधे मेन्शनमध्ये ते अनेकदा जात, असे सावंत म्हणाले.

सैनिकांच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ-

पहिल्या महायुद्धात प्राण गमावलेल्या मराठी सैनिकांच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी शनिवारवाड्याच्या आवारात एक स्मृतिस्तंभ बसवला होता. तो आता कॅम्प परिसरात बसवण्यात आला आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली. शाहू महाराज शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होते. पुण्यातून सुरू झालेली गोष्ट राज्यात सगळीकडे सुरु होईल, या विश्वासानेच त्यांनी कोल्हापुरातून पुण्यात येऊन इथे शिक्षणसंस्थांना सुरुवात करून दिली असावी, असे मत सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title: due to Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj Pune became the home of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.