मद्यधुंद पोलिसाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवले; पोलिसांकडूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:43 IST2025-07-11T10:42:07+5:302025-07-11T10:43:03+5:30

घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्या कारचे फोटो काढल्याने ते शक्य झाले संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई सुरु झाली

Drunk police car hits a biker Police try to cover up the case in saswad | मद्यधुंद पोलिसाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवले; पोलिसांकडूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पण...

मद्यधुंद पोलिसाच्या कारने दुचाकीस्वाराला उडवले; पोलिसांकडूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पण...

सासवड : सासवड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यात त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असल्याचा प्रकार आठ दिवसांनी म्हणजे गुरुवारी (दि. १०) उडकीस आला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी त्या कारचे फोटो काढल्याने ते शक्य झाले नाही. अखेर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

संजय रामचंद्र मोरे (रा. सोनेरी, ता. पुरंदर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर पोलिस कर्मचारी योगेश गरूड याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ जुलैला सायंकाळी सोनेरीवरून सासवडच्या दिशेने येणाऱ्या कारने (क्र. एमएच- १२, क्यूएफ- ५२९०) संजय मोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कारचालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने काही नागरिकांनी कारचे फोटोही मोबाइलमध्ये घेतले होते. दरम्यान, संजय मोरे यांना सासवडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीरतेमुळे त्यांना कोंढवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तब्बल आठ दिवस उपचार सुरू होते. मात्र, नंतर दि. ९ जुलै रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर संजय मोरे यांचे नातेवाईक अजय संजय मोरे यांनी फिर्याद दिली. तसेच ही कार कोणाची आहे, याची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तरीही पोलिसांकडून चालढकलपणा करण्यात येत आहे. अखेर फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज सादर केल्यानंतर ही कार योगेश गरूड यांचीच असल्याचे समाेर आले.

कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न

सासवड पोलिस ठाण्यात नेमणुकीस असताना योगेश गरूड याने सोनोरीजवळ एका हॉटेलसमोर कारमध्ये बसून सहकाऱ्यासोबत मद्यपान केले. सदरचे कृत्य हाॅटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असतानाच चारचाकी गाडी चालवून सासवडकडे येताना वाटेत दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर सुमारे ५० फूट दुचाकी फरपटत नेल्याने प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. असे असतानाही सासवड पोलिस प्रशासनाने पोलिस कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

सासवड पोलिसांची संशयास्पद भूमिका उघडकीस आली आहे. घटनेनंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची मद्यधुंद अवस्थेची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा नोंदवण्याऐवजी प्रशासनाने त्याला मुभा दिली. याच काळात त्या कर्मचाऱ्याने वडकी येथील शोरूममध्ये जाऊन कार दुरुस्त करून घेतली. मद्यपानाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील झाला असून, प्रशासनाने याबाबत कुठलीही नोंद न घेण्याकडे लक्ष दिले. मात्र, त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजमुळे या कर्मचाऱ्यांची खरी स्थिती उघड झाली.

अपघाताप्रकरणी फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित कार पोलिस कर्मचाऱ्याची असून पुढील तपासात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - ऋषिकेश अधिकारी, पोलिस निरीक्षक, सासवड

Web Title: Drunk police car hits a biker Police try to cover up the case in saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.