पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? धानोरी परिसरात भरधाव कारने रिक्षाला उडवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 09:45 IST2024-06-17T09:41:32+5:302024-06-17T09:45:42+5:30

सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला...

Drunk and drive again in Pune? A speeding car overturned a rickshaw in Dhanori area  | पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? धानोरी परिसरात भरधाव कारने रिक्षाला उडवले 

पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्ह? धानोरी परिसरात भरधाव कारने रिक्षाला उडवले 

- किरण शिंदे

पुणे : पुण्यातील धानोरी परिसरात मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका चारचाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षात थांबलेली चौघेजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. आरोपी कारचालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आईस्क्रीम खाण्यासाठी रिक्षा चालक थांबला होता. यावेळी रिक्षामध्ये दोन महिला लहान मुलगी आणि रिक्षा चालक असे चौघेजण होते. याच दरम्यान पोरवाल रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. यामध्ये रिक्षातील तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचालक असलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय चाचणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. मेडिकल रिपोर्ट मधून तो दारूच्या नशेत होता का हे समोर येईल. याप्रकरणी रिक्षा चालक आणि त्याच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात येत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Drunk and drive again in Pune? A speeding car overturned a rickshaw in Dhanori area