लायसन्स नसताना ट्रक चालवला; भरधाव वेगात दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, केसनंद परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 16:45 IST2025-05-19T16:44:43+5:302025-05-19T16:45:14+5:30
ट्रक चालवण्याचे लायसन्स नसतानाही त्याने ट्रक चालवत केसनंद गाव चौकापर्यंत आणला, भरधाव ट्रकने एका व्यक्तीला जोराची धडक दिली

लायसन्स नसताना ट्रक चालवला; भरधाव वेगात दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, केसनंद परिसरातील घटना
पुणे : ट्रक चालवण्याचे लायसन्स नसताना एकाने ट्रक चालवत रस्त्यावर आणला. संबंधित ट्रक भरधाव वेगात चालवून एका धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला. रामदास साहेबराव गायकवाड (५२) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयत इसमाचा भाऊ यशवंत साहेबराव गायकवाड (४०, रा. दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक मालक संतोष आत्माराम भंडारे (४७, रा. शिरूर) आणि ट्रक चालक जनार्दन बाबुराव चव्हाण (६३, रा. रायकर मळा, यवत) या दोघांविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जनार्दन चव्हाण याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १८) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संतोष भंडारे याच्या मालकीचा ट्रक त्याने जनार्दन चव्हाण याला चालवायला दिला. जनार्दन याच्याकडे ट्रक चालवण्याचे लायसन्स नसतानाही त्याने ट्रक चालवत केसनंद गाव चौकापर्यंत आणला. भरधाव ट्रकने रामदास गायकवाड यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक केदार करत आहेत. खराडी भागात शनिवारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कोंढवा भागात झालेल्या अपघातात कारच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
‘यमदूत’ आयुक्तांना जुमानत नाहीत
चार दिवसांपूर्वी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना शहरात हायवा, टिप्पर फिरू देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश दिले होते. यावेळी बोलताना आयुक्तांनी बहुतांश टिप्पर, हायवा हे शहरातील राजकीय मंडळींच्या मालकीचे असल्याने त्यांच्या दबावाला बळी देखील पडू नका असेही सांगितले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी हायवा चालकाच्या निष्काळजणीपणामुळे हा अपघात झाल्याने हे ‘यमदूत’ पोलिस आयुक्तांना देखील जुमानत नसल्याचे दिसून येते. यापूर्वी देखील अनेकांचा सिमेंट मिक्सर, हायवा, टिप्पर यांच्या चुकांमुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या यमदूतांचा शहरातील वावर पूर्ण बंद केला तरच भविष्यात अनेकांचे प्राण वाचतील.