चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील भीषण अपघातात कारचालक जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 17:51 IST2021-06-13T17:51:51+5:302021-06-13T17:51:58+5:30
कारला धडकलेला टेम्पो चालक मद्यपान करून बेधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आले आढळून

चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील भीषण अपघातात कारचालक जागीच ठार, तर पत्नी गंभीर जखमी
शेलपिंपळगाव: चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावरील बहुळ गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने विरुद्ध दिशेने जाऊन समोर आलेल्या कारला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचालक जागीच ठार झाले आहेत. तर त्यांच्या समवेत असणारी त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे टेम्पो चालक मद्यपान करून बेधुंद अवस्थेत वाहन चालवीत असल्याचे आढळून आले.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास हॉटेल धनगरी बाणा समोर घडला. तान्हाजी तुकाराम साकोरे (वय ४८ रा. केंदूर महादेवाडी ता. शिरूर) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संगीता तानाजी साकोरे (वय ४५ रा. केंदूर) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
संबंधित साकोरे पती - पत्नी दाम्पत्य दवाखान्यात उपचार घेऊन चाकणहून स्वतःच्या कारने घराकडे जात होते. मात्र बहुळ हद्दीत समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने कारला समोरासमोर जोरात धडक दिली. टेम्पोचा वेग जास्त असल्याने ती कारच्या समोरील बाजूवर आदळली. कारमधील प्रवाशांना जबर मार लागला. अपघातानंतर स्थानिक तरुणांच्या अथक प्रयत्नांनी कारमधील दोघांना बाहेर काढले. दुर्दैवाने कारचालकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
केंदूर गावचे रहिवासी असलेल्या तान्हाजी साकोरे यांची परिस्थिती एकदम गरीब असून चाकण येथे खाजगी कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. त्यांच्या मृत्यूस जबाबदार झालेल्या टेम्पोचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अधिक तपास चाकण पोलीस करत आहे.