नवले पुलावर चालकाकडून गाडी 'न्यूट्रल', अतिवेगामुळे नियंत्रण सुटून अपघात; तपासातून समोर आला निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:19 IST2025-11-21T16:17:17+5:302025-11-21T16:19:18+5:30
नवले पुलाजवळ कंटेनरचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे

नवले पुलावर चालकाकडून गाडी 'न्यूट्रल', अतिवेगामुळे नियंत्रण सुटून अपघात; तपासातून समोर आला निष्कर्ष
पुणे : नवले पुलाजवळील अपघात कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) प्राथमिक तपासणीमध्ये दिसून आले आहे. तसेच, कंटेनर चालकाने गाडी ‘न्यूट्रल’ केल्याची शक्यता असून, अतिवेगामुळे कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची शक्यता आहे. हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे दिसून आले आहे. अंतिम अहवाल आरटीओकडून तयार करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात १३ नोव्हेंबरला नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचा अपघात झाल्याने आग लागून कार व कंटेनरमधील आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये कार व कंटेनर आगीमध्ये जळून खाक झाला होता. या अपघाताची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु कंटेनरचा गिअर बॉक्स जळाल्यामुळे हा अपघात कसा झाला, हे शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक व महामार्गावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून माहिती गोळा करत होते. त्यावेळी कंटेनरचा वेग जास्त होता. नवले पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. हा अपघात मानवी चुकांमुळेच झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
आरटीओकडून आणखी एक पथक
पुणे आरटीओकडून सातारा ते पुणे दरम्यान वाहनांची तपासणी करण्यासाठी एक पथक वाढविण्यात आले आहे. पूर्वी एकच पथक तपासणी करत होते. आता दोन पथकांमध्ये १० अधिकारी वाहनांची तपासणी करणार आहेत. एक पथक फिरते राहणार असून, दुसरे पथक टोल नाका परिसरात वाहनांची तपासणी करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जड वाहनांवरील चालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. वाहनांची कागदपत्रे, वाहन ओव्हर लोडिंग आहे का? याची तपासणी करण्यात येईल. तसेच, टोल नाका परिसरात जड वाहनांच्या चालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.