सोशल मिडीयाचा वापर करताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरुण तरुणींना आवाहन
By नितीश गोवंडे | Updated: January 29, 2025 17:29 IST2025-01-29T17:29:08+5:302025-01-29T17:29:35+5:30
सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये याबाबत आवश्यक ती काळजी घ्या

सोशल मिडीयाचा वापर करताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरुण तरुणींना आवाहन
पुणे : सोशल मिडीयाचा वापर करताना आपण काय करतोय याची नेहमी जाणीव ठेवा. कोणतीही पोस्ट तुमच्या अंगलट येऊ नये यासाठी तुम्हीच तुमच्यासाठी लक्ष्मण रेषा आखून घ्या. असे आवाहन पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी तरूण-तरूणींना केले आहे. हडपसर येथील मगपट्टासिटी येथील आयटी कंपन्यांसोबत परिसंवादाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मगरपट्टा सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोजकुमार पाटील, परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मंगल मोढवे, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनय पाटणकर, काळे पडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, तुमच्या आजुबाजुला अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या. पुणे पोलिसांनी ड्रग तस्करीचे मोठे रॅकेट मागील वर्षात उध्वस्त केले असून यामध्ये 3 हजार 700 कोटी रूपयांचे ड्रग जप्त केले. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजु बाजुला असे ड्रगचा काही प्रकार आढळल्यास तुम्ही आम्हाला कळवा. पोलिस आणि नागरिकांनी मिळून मिसळून काम केल्यास अशा अवैध प्रकारांवर आळा घालण्यास मदत होईल. नुकताच येरवडा परिसरात झालेल्या तरूणीच्या खुनाच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी उपस्थिती आयटीएन्स विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच कंपन्यांनी महिलांच्या, तरूणींच्या सुरक्षेसाठी उपाय योजनांचे काटेकोर पालन करावे असे अवाहन केले.
पोर्शे कार अपघातानंतर एका स्टँडअप कॉमीडीअन कडून पोर्शे कारमधील आरोपी सुटल्याचा खोटा प्रचार सुरू असल्याचे अमितेश कुमार यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचा समाचार घेताना पोर्शे अपघात ज्यांचा ज्यांचा सहभाग आढळला ते गेली आठ महिन्यापासून कारागृहात असल्याचे पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. त्यांना अद्यापपर्यं जामीन मिळाला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी पोलिसांकडे हडपसर परिसरातील वाहतुक कोंडी, शाळेभोवती असलेल्या टपर्या, रस्त्याने फिरणारे रोडरोमीओ यांच्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी आयुक्तांनी तात्काळ यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
शहरातील शाळांच्या परिसरातील टपऱ्या उखडून टाका
शहरातील बहुसंख्य शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपऱ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याच टपऱ्यावर शाळकरी मुले येरझाऱ्या मारताना तसेच सिगारेट सारखी व्यसने करतना आढळून आली आहे. याकडे नागरिकांनी प्रश्नाद्वारे पोलिस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळांच्या शंभर मिटर परिसरात तसेच अनिधिकृत टपऱ्या उखडून टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी धडक आदेश देताताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.