पुणेकरांचा अंत पाहू नका, उद्घाटन करून टाका, काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 16:53 IST2025-08-18T16:53:19+5:302025-08-18T16:53:39+5:30
भारतीय जनता पक्षाला प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या राजकारणाशी जोडण्याचा छंद लागला आहे

पुणेकरांचा अंत पाहू नका, उद्घाटन करून टाका, काँग्रेसची मागणी
पुणे : सिंहगड रस्ता व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता या दोन्ही रस्त्यांवरच्या उड्डाणपुलांच्या कामामुळे सलग तीन-चार वर्षे पुणेकर त्रास सहन करत आहेत. आता काम झाले तरीही केवळ प्रमुख पाहुणे मिळत नाहीत म्हणून पुल सुरू करण्याचे लांबवले जात आहे. पुणेकरांचा अंत पाहू नका, उद्घाटन करून टाका, अशी मागणी काँग्रेसने केली.
भारतीय जनता पक्षाला प्रत्येक गोष्ट निवडणुकीच्या राजकारणाशी जोडण्याचा छंद लागला आहे, अशी टीका पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली. रस्त्यावर किंवा चौकात साधे लोखंडी बाक बसवले तरी त्यावर भाजपच्या ध्वजाचा रंग लावून संकल्पना वगैरे लिहिली जाते. प्रत्येक कार्यक्रमाचा इव्हेंट करण्याच्या भाजपच्या हौसेमुळे पुणेकर वाहनधारक मात्र त्रस्त झाले आहेत. सिंहगड रस्त्यावरील पुल काम अपुरे असताना घाईघाईत सुरू करण्यात आला, आता काम पुर्ण झाले तर तो सुरू करत नाहीत. विद्यापीठ चौकातील पुल सुरू होत नसल्याने तिथे वाहनधारकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. पुल कधी सुरू होणार अशी विचारणा होत आहे असे जोशी म्हणाले. या दोन्ही पुलांचे उद्घाटन करून ते सुरू करावेत, अन्यथा काँग्रेस पुणेकरांना बरोबर घेऊन दोन्ही पूल सुरू करून देईल, असा इशारा जोशी यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना त्यांनी याबाबतचे पत्र दिले.