Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा फज्जाच; पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:28 IST2026-04-15T14:23:19+5:302026-04-15T14:28:02+5:30
अनेक मंडळांनी रात्री ११ पासूनच डीजे लावून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली असून त्यानंतर मंगळवारी दिवसभर सर्वत्र डीजेचा दणदणाट पहायला मिळाला.

Dr Babasaheb Ambedkar Jayanti: डीजेमुक्त आंबेडकर जयंतीचा फज्जाच; पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट
पुणे : वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदाची जयंती डीजेमुक्त साजरी करण्याचे आवाहन 'मध्यवर्ती जयंती समिती केले होते. या आवाहनाला शहरातील विविध दलित संस्था आणि संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्यक्षात मात्र, डीजे मुक्त जयंतीचा फज्जा उडाल्याचे चित्र मंगळवारी शहरात पहायला मिळाले. दरम्यान, हे पोलिस प्रशासनाचे अपयश असल्याचे डीजे मुक्त जयंतीच्या समर्थकांनी नमूद केले आहे.
'गोंगाटात विचार हरवू नका' हा मोलाचा संदेश देण्यासाठी बाबासाहेबांची जयंती डीजे ऐवजी वैचारिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचे आवाहन 'मध्यवर्ती जयंती समिती केले होते. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी अनेक दलित संस्था व संघटनांशी संपर्क करून सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातील जवळपास ४० संस्था व संघटनांनी पाठिंबा दिला. मात्र, जयंतीच्या दिवशी डीजेच्या दणदणाटाने हा विचार मागे पडल्याचे चित्र होते.
शहरातील जवळपास सर्वच सार्वजनिक जयंती मंडळांनी मध्यरात्री १२ वाजता फटाके उडवून बाबासाहेबांच्या जन्मदिनाचे स्वागत केले. यावेळी अनेक मंडळांनी रात्री ११ पासूनच डीजे लावून वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मंगळवारी दिवसभर सर्वत्र डीजेचा दणदणाट पहायला मिळाला. सायंकाळी चार नंतर रात्री उशिरापर्यंत सर्वत्र डीजेच्या दणदणाटामध्ये मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे डीजे मुक्त जयंतीसाठी आणखी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे.
पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे ‘सायलेन्स झोन’मध्ये डीजेचा दणदणाट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'नो डीजे'चा विधायक निर्णय घेतला असतानाही, पुणे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे ससून रुग्णालय परिसरात डीजेचा थरकाप पहायला मिळाला. "आम्ही १२, १३ आणि १४ एप्रिल रोजी सलग तीन दिवस लेखी निवेदने देऊनही पोलिसांनी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलिसांच्या या अकार्यक्षमतेमुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.या बेजबाबदारपणा विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राहुल डंबाळे यांनी सांगितले.
तीस फुटी बुद्धरुपाने वेधले लक्ष
गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली डीजेची परंपरा मोडीत काढत, 'भीमसेवा प्रतिष्ठान' आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यंदाची जयंती 'डीजे'मुक्त साजरी केली. यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ३० फुटांचे भव्य बुद्धरूप असलेला विशेष देखावा. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा देखावा उभारण्यात आला होता. तसेच मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून सुमारे एक हजार अनुयायांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटण्यात आली.
पुतळा परिसरातील डीजेवर निर्बंध गरजेचे
बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी लहान मुलांसह वृद्ध मंडळी येतात. गर्दीमुळे अनेकवेळा चुकामुक होते. मात्र, दिवसभर पुतळ्याच्या परिसरात डीजे, डॉल्बीच्या भिंती लावून मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. त्यामुळे पुतळ्याच्या परिसरात कोण काय बोलते ते कळतच नाही. कोणी हात सोडून लहान मुलगा गेला तर त्याला आवाज दिल्यानंतर डॉल्बीच्या आवाजामुळे आवाज येत नाही. त्यामुळे या परिसरात लावण्यात येणाऱ्या डॉल्बी सिस्टीमवर निर्बंध आणावेत आणि येथील ध्वनीप्रदूषण थांबवावे, अशी मागणी दै. लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना अनेकांनी व्यक्त केली.