भोर एसटीस्थानकावर संतप्त जमावाकडून तोडफोड

By Admin | Updated: September 23, 2014 06:42 IST2014-09-23T06:42:21+5:302014-09-23T06:42:21+5:30

स्टँडची सुरक्षा रामभरोसे भोर एसटी स्टँडवर दररोज ३ ते ४ हजार विद्यार्थी प्रवास करतात. या शिवाय इतर प्रवास कसणारे हजारो प्रवासी आहेत.

Disrupted by angry crowd at ST station | भोर एसटीस्थानकावर संतप्त जमावाकडून तोडफोड

भोर एसटीस्थानकावर संतप्त जमावाकडून तोडफोड

भोर - स्टँडची सुरक्षा रामभरोसे भोर एसटी स्टँडवर दररोज ३ ते ४ हजार विद्यार्थी प्रवास करतात. या शिवाय इतर प्रवास कसणारे हजारो प्रवासी आहेत. यामुळे दररोज दुपारी ११ ते २ वाजपर्यंत येथे मोठी गर्दी असते. या वेळी मुलींसह अबालवृद्धांना गाडीत चढता येत नाही. धक्काबुक्की होते. अनेक मुले एसटीत चढताना खिडकीतून प्रवेश करतात. यातून लहान-मोठे अपघात होतात. वादावादीही होते. मात्र, एसटी स्टँडवर वाहतूक नियंत्रक नाही, शिवाय अनेकदा मागणी करूनही वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात नसल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्टँडवर दुचाकी, चारचाकी वाहनेही लावली जातात. यामुळेही वाहतुकीचा खोळंबा होतो याकडेही आगाराचे दुर्लक्ष आहे, यातूनच असे अपघात घडतात. भोर : स्वारगेट- भोर एसटी बसखाली सापडून एक वृद्ध महिला जागीच ठार झाली. त्यामुळे संतप्त जमावाने येथील एका मिनीबसची व कंट्रालरूमची तोडफोड केली. सदर महिलेचा मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने भोर एसटी स्टँडवर तणाव निर्माण झाला होता. एसटी बसेस रोखून धरल्याने सुमारे तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
लीलाबाई बाळू गोळे (६६, रा. पोम्बर्डी, ता. भोर) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११.४५ वा घडली. चालकाला अटक करण्यात आली आहे.
एमएच १२, सी.एच. ७0१४ ही स्वारगेट-भोर एसटी बस भोर स्टँडवर प्रवाशी उतरवून महुडे गावाला जात होती. त्या वेळी लीलाबाई गोळे या महिलेला बसने उडवले. त्यात ती उजव्या बाजूच्या पुढच्या व मागच्या दोन्ही चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. त्यानंतर एसटी आगाराकडून उशिराने कारवाई झाल्याने येथील जमाव संतप्त झाला. सदर महिलेचा मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी विरोध केला होता. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. मात्र, आगारप्रमुखांनी लेखी दिल्यावर तणाव शांत झाला. भोर पोलिसांनी एसटी चालक बबन दगडू बदक (रा. बारे खुर्द) याला अटक केली आहे. सदरच्या महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होती. आज दुपारी ही महिला आपल्या मुलीकडे केंजळ गावाला जाण्यासाठी आली होती. त्याच वेळी ही घटना घडली. दरम्यान, महामंडळाकडून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आगारप्रमुख भोंडवे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Disrupted by angry crowd at ST station