'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 14:40 IST2025-08-18T14:39:31+5:302025-08-18T14:40:39+5:30
मुलीचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि डिवोर्सचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती

'दिदी, मला तुमच्या मदतीची गरज..' दामिनी मार्शलचे हस्तक्षेप, दहावीतील टॉपर विद्यार्थिनीचे कुटुंब एकत्र आणले
पुणे : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्त असलेल्या दामिनी मार्शल पोलिस शिपाई सोनाली हिंगे यांनी वेळीच पुढाकार घेत एका दहावीच्या टॉपर विद्यार्थिनीचे घर सोडून जाण्याचे मनसुबे फोल ठरवत तिचे कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात मोलाची भूमिका बजावली.
आज सकाळी १० ते १०.१५ च्या दरम्यान हिंगे यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणारी मुलगी म्हणाली, "दिदी, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी घर सोडून चालले आहे. मला खूप टेन्शन आहे." चौकशीदरम्यान दामिनी मार्शल यांना समजले की ही विद्यार्थिनी दहावीत शिकत असून शाळेत सतत टॉपर आहे. मात्र तिचे आई-वडील एकत्र राहत नसल्याने आणि डिवोर्सचा खटला सुरू असल्याने घरगुती वादामुळे ती मानसिक तणावाखाली होती. “मला जगायचे नाही” असे तिने भावनिक उद्गार काढले होते.
हिंगे यांनी तात्काळ मुलीची भेट घेतली, तिला धीर दिला आणि नंतर तिच्या शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून त्यांच्यासोबत चर्चा केली. “तुमची मुलगीच तुमचं भवितव्य आहे, अशा कोवळ्या जीवाला जपा” असे समजावून सांगत त्यांच्या मनपरिवर्तनास यश आले.
चर्चेनंतर मुलीच्या पालकांनी आपले भांडण बाजूला ठेवून डिवोर्सची केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि आनंदी कुटुंब म्हणून राहण्याचे ठरवले. या निर्णयामुळे विद्यार्थिनी अत्यंत आनंदी झाली असून तिने, तिच्या पालकांनी तसेच शाळेच्या प्राचार्यांनी दामिनी मार्शल व पुणे शहर पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत."