अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची मागणी; बारामतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:39 IST2025-05-14T20:39:39+5:302025-05-14T20:39:52+5:30
गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि तो दाखल झाला तर त्यात अटक न करण्यासाठी पोलिसाने ३० हजार रुपये लाचेची मागणी केली, तडजोडी अंती १० हजार रुपये लाच मागण्यात आली होती

अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची मागणी; बारामतीच्या सहायक पोलीस उपनिरीक्षकासह दोघांवर गुन्हा दाखल
बारामती : अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करत १० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील माणिक जगताप यांच्यासह लाच मागणीला प्रवीण भाऊसाहेब भोसले या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप हे येथील तालुका पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर भोसले हा खासगी इसम आहे.
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराविरोधात अपघात प्रकरणी एक तक्रार दाखल होती. त्यावरून गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि तो दाखल झाला तर त्यात अटक न करण्यासाठी जगताप यांनी त्यांच्याकडे ३० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १० हजार रुपये लाच मागण्यात आली होती. प्रवीण भाऊसाहेब भोसले या खासगी इसमाने लाच मागणीस प्रोत्साहन दिले होते. या तक्रारीची शहानिशा करत अखेर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील जगताप व खासगी इसम भोसले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.