पुणे - बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव मास्टरमाइंड म्हणून पुढे येत आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील विरोधक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात आरोप झालेल्या मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, असा दाखला देत मुंडेंच्या राजीनामा घ्यावा असे सुचवले आहे.
सरकारने नैतिक जबाबदारी घ्यावी
या हत्याकांडावर राज्य सरकारच्या भूमिकेवरही सुळे यांनी सवाल उपस्थित केले. “आदरणीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले, तेव्हा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारली होती. काँग्रेसच्या काळात अशोक चव्हाणांनीही राजीनामा देत नैतिकता दाखवली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाच्या लोकांनी समाजातील भावना ओळखून योग्य निर्णय घ्यावा,” असे त्या म्हणाल्या.
घटना माणुसकी विरुद्ध विकृत मानसिकता
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही घटना आता राजकीय राहिलेली नसून माणुसकी विरुद्ध क्रूर विकृत मानसिकता अशी आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र व्यथित झाला आहे. बीड आणि परभणीतील घटनेत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली पाहिजे.”
“पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्या”
देशमुख कुटुंबातील पीडित मुलीच्या अश्रूंनी मन अस्वस्थ झाले असल्याचे नमूद करत सुळे म्हणाल्या, “सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून या प्रकरणी माणुसकीच्या नात्याने एकत्र येणे आवश्यक आहे. या कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही सध्या सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे.” या प्रकरणाला राजकीय रंग देण्याऐवजी या प्रकरणी सत्य समोर आणून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.