दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 19:38 IST2025-07-17T19:37:02+5:302025-07-17T19:38:25+5:30

तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा विनिमय सुरू असून कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले

Defeat from Sharad Pawar group Now Ramesh Thorat is moving towards Ajit Pawar group | दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

दौंडमध्ये शरद पवार गटातून पराभव; आता रमेश थोरात यांची अजित पवार गटाकडे वाटचाल

दौंड : दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याच्या मार्गावर असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रमेश थोरात जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून लोकनेते शरद पवार यांचा गट, तर दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट असे दोन गट पडले होते. परिणामी या राजकीय घडामोडीत रमेश थोरात यांचा कल अजित पवार गटाकडे राहिला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात शरदचंद्र पवार गटाने बऱ्यापैकी बाजी मारली होती.  अशीच परिस्थिती विधानसभेला राहील, असे राजकीय समीकरण गृहीत धरून ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश थोरात यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला रामराम ठोकून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेतला होता. परिणामी त्यांनी राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांचा काळ लोटल्यानंतर रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रमेश थोरात यांची भेट झाल्यानंतर दोघेही एकाच गाडीतून फिरत असल्यामुळे रमेश थोरात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील प्रवेश निश्चित झाला असल्याचे तालुक्यातून ठामपणे बोलले जात होते. एकंदरीत दौंड तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता पक्ष कुठलाही असो, मात्र राजकारण हे नेहमीच कुल आणि थोरात यांच्याभोवती फिरलेले आहे. त्यानुसार विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांची वैयक्तिक ताकद नाकारून चालणार नाही. कारण या दोघांची ताकद नेहमीच राजकीय पक्षांभोवती फिरत आल्याची वस्तुस्थिती आहे.

कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षप्रवेशासंदर्भात रमेश पवार म्हणाले की, तालुक्यातील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा विनिमय सुरू आहे. कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि माझी मैत्री सर्वश्रूत आहे. त्यानुसार बऱ्याचदा आमच्या दोघांमध्ये चर्चा होत असते. भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या इच्छेनुसार काहीतरी चांगलं फलित होईल, असे शेवटी रमेश थोरात म्हणाले.

कुल - थोरात हेच पक्ष

दौंड तालुक्यात कुल आणि थोरात ही ताकद नाकारून चालणार नाही. पक्ष कुठलाही असो, त्याला पाठबळ मात्र कुल आणि थोरात यांचे असते, तेव्हा सध्या तरी कुल आणि थोरात हेच दोन गट तालुक्यात कार्यरत आहेत, असे माजी आमदार रमेश थोरात म्हणाले.

Web Title: Defeat from Sharad Pawar group Now Ramesh Thorat is moving towards Ajit Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.