दौंड - पुणे डेमू घटना! ज्या व्यक्तीला वाचवले त्याच्यामुळेच लागली आग, रेल्वे प्रशासनाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:14 IST2025-06-16T15:13:19+5:302025-06-16T15:14:38+5:30
प्रवासी स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करत होता, त्याने सिगारेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला

दौंड - पुणे डेमू घटना! ज्या व्यक्तीला वाचवले त्याच्यामुळेच लागली आग, रेल्वे प्रशासनाची माहिती
पुणे : दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागली. ट्रेनला आग लागल्याचं लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. डेमू रेल्वेच्या डब्यात स्वच्छतागृहातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत त्या स्वच्छतागृहात अडकलेल्या प्रवाशाला खिडकीतून इतर नागरिकांनी बाहेर काढले. त्याच प्रवाशाच्या चुकीमुळे आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
रेल्वे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहनलाल कौल (रा.मध्य प्रदेश) हा प्रवासी स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करीत होता. त्याने बिडी अथवा सिगारेट पेटवून उर्वरित काड्या डस्टबिन मध्ये टाकल्याने कचऱ्यातून धूर येऊ लागला. यावेळी बाहेरच्या प्रवाशांनी आरडाओरड केल्याने आतील प्रवासी घाबरला. आणि आत अडकून पडला. अखेर संबंधित प्रवाशाला बाहेर काढल्यानंतर खरा प्रकार समोर आला. संबंधित व्यक्तीला दौंड रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे.
आज सकाळी ७.०५ वाजता दौंड वरुण पुण्याकडे जाणार्या डेमू रेल्वेच्या तिसऱ्या डब्यात स्वच्छतागृहातून धूर येऊ लागल्याने खळबळ उडाली. त्यावेळी सर्व प्रवासी सावध झाले. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता. उघडू शकले नाही. यावेळी आतमध्ये एक व्यक्ती अडकला होता. जागरुक प्रवाशांनी तत्काळ पुढाकार घेत संबंधित व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले अखेरीस खिडकी मधून त्या प्रवाश्याला बाहेर काढण्यात आले. यवत रेल्वे स्टेशन नजीक सदर घटना घडल्यानंतर प्रवाशांची समयसूचकता आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या उपाययोजना यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कसलेही जिवितहानी अथवा वित्त हानी झाली नाही.