Dangerous! 20% increase of eye disease in child during corona lockdown | धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ 

धोकादायक ! कोरोना लॉकडाऊन काळात लहान मुलांच्या नेत्रविकारांमध्ये २० टक्क्यांनी वाढ 

ठळक मुद्देस्क्रीन टाईम वाढला : डोळ्यांचा कोरडेपणा, कृत्रिम अश्रू अशी लक्षणे दिसताहेतलॉकडाऊनदरम्यान दररोज १० लहान मुलांवर नेत्रतज्ज्ञांकडून केले जात आहेत उपचार

पुणे : कोरोना संकटाच्या काळात दैनंदिन जीवन कमालीचे बदलले आहे. एकीकडे मोठ्या माणसांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू असताना लहान मुलेही 'ऑनलाईन शिक्षण' पद्धत अंगवळणी पाडून घेत आहेत. मात्र, ऑनलाईन क्लासेस, स्मार्टफोनवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे अशा विविध कारणांमुळे लहानग्यांच्या नेत्रविकारांमध्ये लॉकडाऊन काळात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लॉकडाऊन कालावधीत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सच्या सतत वापरामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळ्यांच्या कडा लाल होणे, डोळ्यांमधून कृत्रिम अश्रू येणे, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान दररोज १० लहान मुलांवर नेत्रतज्ज्ञांकडून उपचार केले जात आहेत. १० पैकी २ मुलांना चष्मा लागत आहे, असे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे. 

लॉकडाऊन कालावधीत सुरु असलेला डिजिटल अभ्यासक्रम, तासनतास टीव्ही, स्मार्ट फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर या कारणांमुळे लहान मुलांना डोळ्यांचे विकार उद्भवू लागले आहेत. 

सद्यस्थितीत मुलांनी ऑनलाईन शिक्षण घेणे आवश्यक असले तरी त्यासाठी लागणा-या गॅजेट्स वापर कसा आणि किती वेळ करावा, हे पालकांनी ठरवून देणे आवश्यक आहे. अतिवापरामुळे सतत डोळे चोळण्याने मुलांचे कॉर्निया पातळ होऊ शकतात आणि यामुळे त्यांची दृष्टी कायमस्वरूपी कमी होऊ शकते. शिवाय डोळे चोळण्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विशिष्ट दबाव वाढतो, ज्यामुळे दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता आहे.

-----------

खाज सुटणे, कॉर्नियातील कोरडेपणा आणि कॉर्नियल स्ट्रक्चरमध्ये कायमस्वरूपी बदल टाळण्यासाठी या मुलांना आर्टीफिशिअल लुब्रीकंट्स किंवा कृत्रिम अश्रू दिले जातात. व्हिटॅमिन सी आणि ई, झिंक, ल्युटीन, झेक्सॅन्थेन आणि ओमेगा -3 फॅटी एसिडस्, पुरेशी झोप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्यादा आणणे फायदेशीर ठरेल. स्क्रीन टाईम कमी करून मुलांना संतुलित आहार देणे हे त्यांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. योग्य झोप, स्क्रीन टाईम कमी करणे, पोषक आहार आदी गोष्टींनी डोळ्यांच्या समस्यांना दूर करता येणे शक्य आहे.

- डॉ. हेमंत तोडकर, नेत्रतज्ज्ञ

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dangerous! 20% increase of eye disease in child during corona lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.