धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 17:43 IST2025-03-17T17:43:17+5:302025-03-17T17:43:26+5:30
बालेवाडीच्या सर्व्हिस रोडवर अंधारात जमलेल्या आरोपींकडे तलवारी, कोयता, मिरची पुड, सुतळी बंडल आणि चिकटपट्टी, असे घातक शस्त्रे व साहित्य आढळून आले

धोका टळला; मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांना अडवून दरोडा टाकणाऱ्यांना ठोकल्या बेड्या, ६ जणांना अटक
पुणे: मुंबई-पुणेमहामार्गावरील सर्व्हिस रोडवर प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले. सोहम सिद्धेश्वर वाघमारे (२०, रा. महाळुंगे), कैफ सत्तार शेख (१९, रा. बालेवाडी), नाथा शहाजी वाघमारे (१८, रा. बालेवाडी), ताहीर गुलाब मुलतान (१९, रा. बालेवाडी), सुमित भीमराव गायकवाड (१९, रा. महाळुंगे) आणि तुकाराम पांडुरंग उचके (१९, रा. म्हातोबानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार दशरथ खुडे यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बालेवाडी येथील अमर टेकजवळ रविवारी (दि. १६) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर पोलिस ठाण्याचे पथक मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना बालेवाडी येथील सर्व्हिस रोडवर काही जण अंधारात जमल्याचे दिसले. प्रवाशांना लुटण्याचा बेत आखून ते एकत्र आले होते. पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरले आणि पकडले. त्यांच्याकडे तलवारी, कोयता, मिरची पुड, सुतळी बंडल आणि चिकटपट्टी, असे घातक शस्त्रे व साहित्य आढळून आले. पोलिसांनी हे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर सर्व्हिस रोडवर येणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना लुटण्याचा बेत आखून दरोड्याच्या तयारीने जमलो असल्याचे सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक अनिल केकाण पुढील तपास करत आहेत.