भोरमध्ये ‘पार्टी’वाल्यांची दादागिरी!
By Admin | Updated: September 22, 2014 05:39 IST2014-09-22T05:39:21+5:302014-09-22T05:39:21+5:30
निवंगुणी (जयतपाड, भोर) येथे पार्टीवाल्याकडून गावाच्या पाणंद रस्त्यावर गेट बसवल्याच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शंकर कोंडिबा मराठे (वय ७७) यांचा मृत्यू झाला.

भोरमध्ये ‘पार्टी’वाल्यांची दादागिरी!
भोर : निवंगुणी (जयतपाड, भोर) येथे पार्टीवाल्याकडून गावाच्या पाणंद रस्त्यावर गेट बसवल्याच्या वादातून अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या मारहाणीत वयोवृद्ध शंकर कोंडिबा मराठे (वय ७७) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वा. घडली. आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याने गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी, निवंगुणी हे २५ घरांचे व १०० लोकवस्तीचे गाव आहे. ३ वर्षांपूर्वी गावातील २० एकर जमीन कुलमुखत्यारपत्र करून विक्री केली. ही जमीन सीमा सचिन मुंगळे (रा. पुणे) यांनी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी गावच्या स्मशानभूमीकडे व धरणाकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर गेट लावून रस्ता बंद केला. यामुळे जनावरे पाण्यावर घेऊन जाणे, मृतदेह अंत्यविधीला नेणे, गणेशविसर्जन करणे याची लोकांची अडचण झाली. यामुळे ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करून रस्ता खुला करण्याची मागणी केली.
त्यानंतर तहसीलदारांनी पाहणी केली असता, सदरचा पाणंद रस्ता गट नं. १-६ मध्ये गाव नकाशावर असल्याने गेट काढून रस्ता खुला करून दिला. सदरचा रस्ता खुला झाल्याचा राग मनात धरून पार्टीवाले मुंगळे यांनी गावातील दिनेश लाळे, बापू जाधव, अनिल कोळपे, अनिल आडुळकर यांच्या विरोधात गेट चोरल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुंगळे यांनी तेच गेट काल ३ वा. पुन्हा पाणंद रस्त्यावर बसवल्याने ग्रामस्थांनी त्यांना विचारले, गेट चोरीला गेले होते; मग परत कसे आले, यातून वादावादी झाली. मुंगळे यांनी तक्रार केल्यावर पोलीस गावात येऊन चार तरुणांना घेऊन गेल्यावर तोंडाला रुमाल बांधलेल्या लोकांनी शंकर मराठे यांच्या घरात घुसून अंधाराचा फायदा घेत मराठे यांना, त्यांच्या भावाला, मुलगीला मारहाण केली. यात शंक र मराठे यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ७.३० वा. घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी रात्री ११ वा. फिर्याद दिली. मुंगळे यांच्या लोकांनीच मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले; मात्र आरोपींना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास लोकांनी विरोध केला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मुंगळे यांनीही ग्रामस्थांनी त्यांच्या मानसांना मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. (वार्ताहर)