भाजपला घंटानाद आंदोलन भोवलं; पुण्यात चंद्रकांत पाटलांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 21:47 IST2021-09-01T21:36:25+5:302021-09-01T21:47:19+5:30
कोरोना नियमांचे उल्लंघन करुन आंदाेलन केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह ३० ते ४० जणांवर केला गुन्हा दाखल...

भाजपला घंटानाद आंदोलन भोवलं; पुण्यात चंद्रकांत पाटलांसह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंदिरे उघडावीत या कारणावरुन आघाडी सरकारविरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. कोरोना नियमांचे उल्लंघन करुन आंदाेलन केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, प्रमोद कोंढरे, राजेश पांडे, स्वरदा बापट, हेमंत रासने, गणेश बिडकर, दीपक पोटे, राजेंद्र मानकर यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील मंदिरे उघडावीत या कारणावरुन सोमवारी भाजपने राज्यभरात आंदोलन केले होते. भाजपचे कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी नाकारली होती. असे असताना चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी कसबा गणपती मंदिरासमोर जमले.
Pune: A case has been registered against Maharashtra BJP chief Chandrakant Patil, Pune city mayor Murlidhar Mohol, BJP city president Jagdish Mulik & other BJP workers for violating COVID guidelines during a protest on 30th August demanding the reopening of temples in state.
— ANI (@ANI) September 1, 2021
हातात झेंडे, बॅनर, टाळ घेऊन येऊन कसबा मंदिरासमोर घंटानाद करुन शंख, टाळ वाजवून, स्पिकरवर आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना कारवाई करण्यात येईल, अशा सूचना दिल्या. तरीही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या सुचनांचे उल्लंघन करुन आंदोलकांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी मंदिराचे विश्वस्त संगीता ठकार यांच्या घरातून मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेऊन घंटानाद आंदोलन सुरु ठेवले. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी १८८, २६९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.