आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:13 IST2025-07-30T18:12:49+5:302025-07-30T18:13:06+5:30
Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला

आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
Pune Porsche Car Accident: पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला. गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याचे गांभीर्य, शिक्षेची तीव्रता, खटल्याद्वारे आधारलेल्या सामग्रीचे स्वरूप, साक्षीदारांशी छेडछाड करण्याची वाजवी भीती आणि जनतेच्या हितसंबंधांचा विचार करता, या टप्प्यावर आरोपीला तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे कोणतेही न्यायिक कारण दिसत नाही, असे नमूद करीत अर्ज नामंजूर केला.
कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. विशाल अग्रवाल यानेही आई आजारी असल्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, जामीन अर्जावर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. आरोपीचे वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मेहुणे आरोपीच्या आईची काळजी घेऊ शकतात. अर्जदार आरोपीकडून खटल्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मागितल्याप्रमाणे तात्पुरता जामीन मंजूर केल्याने खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा तर बचाव पक्षाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अर्ज मंजूर करण्याचा विचार करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालचा जामीन अर्ज फेटाळला.