शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:43 IST2025-08-18T18:42:00+5:302025-08-18T18:43:33+5:30
सासवड - वीर रस्त्यावरून पती आणि पत्नी शेतातून काम उरकून घरी चालत येत होते, त्यावेळी इको मोटारीने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली

शेतातून काम उरकून घरी चालत जाणाऱ्या दाम्पत्याला मोटारीची धडक; गंभीर जखमी होऊन दोघांचा मृत्यू
सासवड : यादववाडी (ता.पुरंदर) च्या हद्दीत फार्महाऊस हॉटेलजवळ पाठीमागून मोटारीने पादचारी दाम्पत्याला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचाही गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. आनंदराव रामचंद्र यादव व सिंधुमती आनंदराव यादव (रा. यादववाडी, ता. पुरंदर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर मोटारचालक बापूराव जगताप (रा. माहुर, ता. पुरंदर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस पाटील अमित गणपत यादव (रा. यादववाडी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी गावच्या हद्दीत सासवड - वीर रस्त्यावरून आनंदराव यादव व त्यांच्या पत्नी सिंधु यादव हे शेतातून काम उरकून घरी चालत येत होते. त्यावेळी त्यांना बापूराव जगताप याने त्याच्या इको मोटारीने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात यादव दाम्पत्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षिक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.