पुण्यात विक्री होणाऱ्या कफ सिरपची तपासणी; मध्य प्रदेश, राजस्थानमधील घटनेमुळे औषध प्रशासन सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:53 IST2025-10-06T12:52:33+5:302025-10-06T12:53:06+5:30
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली असून, संबंधित कंपनीच्या सिरपची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

पुण्यात विक्री होणाऱ्या कफ सिरपची तपासणी; मध्य प्रदेश, राजस्थानमधील घटनेमुळे औषध प्रशासन सतर्क
पुणे : मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर राज्यातील औषध प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. पुणे विभागात विक्री होणाऱ्या कफ सिरपची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केली असून, संबंधित कंपनीच्या सिरपची विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश औषध विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
दोन्ही राज्यांमध्ये आतापर्यंत १२ मुलांचा मृत्यू झाल्याची नोंद असून, या मृत्यूंमागे दूषित कफ सिरप कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एफडीएने पुण्यात या कंपनीचा औषधसाठा उपलब्ध आहे का, याची तपासणी हाती घेतली आहे. संबंधित कंपनीच्या सिरपचा साठा आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश निरीक्षकांना देण्यात आले असल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सेवा महासंचालनालयाने (डीजीएचएस) दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. या वयोगटातील मुलांच्या शरीरात औषधांतील रासायनिक घटकांचे विघटन व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्याचे विषारी दुष्परिणाम होऊ शकतात. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही ही औषधे पूर्णपणे सुरक्षित नसल्याचे डीजीएचएसने म्हटले आहे. एफडीएने तपासणी सुरू ठेवली असून, संबंधित कंपनीचे कफ सिरप पुण्यात सापडल्यास तातडीने जप्ती व नमुना चाचणी केली जाईल. प्रशासनाने पालकांना सावधगिरीचा इशारा देत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना कोणतेही कफ सिरप देऊ नये, असे आवाहन केले आहे.
पुणे जिल्ह्यात सुमारे २२ हजार केमिस्ट कार्यरत आहेत. आमच्या सदस्यांकडून नियमानुसारच औषधांची विक्री केली जाते. संबंधित कंपनीचा साठा सध्या शहरातील कोणत्याही उत्पादक किंवा विक्रेत्याकडे उपलब्ध नाही. - अनिल बेलकर, सचिव, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन.