हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:04 IST2025-11-18T10:04:28+5:302025-11-18T10:04:38+5:30
राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर हा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात आला आहे

हवेली तहसील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यावरून गोंधळ
पुणे: नेहरू रस्त्यावरील हवेली तहसील कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर केल्यानंतर जुन्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला होता. मात्र, राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर हा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात आला आहे. संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते. ज्या जागी शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्वी होता, तिथेच तो पुन्हा बसवला नाही तर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खडकमाळ येथे नवीन प्रशासकीय भवन बांधून पूर्ण झाल्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांचे नवीन भवनात स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अनुषंगाने हवेली तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे स्थानांतर करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने विनंती केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी सदर पुतळा डागडुजीसाठी व पुढील स्थापनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, सोमवारी (दि.१७) शिवप्रेमी संघटनांनी पुतळा स्थलांतरासंबंधी आक्षेप नोंदविला. जनभावनांचा आदर राखण्यासाठी पुतळा पुन्हा हवेली तहसील कार्यालयाच्या प्रांगणातच पूर्ववत स्थापित करण्यात आल्याचे हवेली तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.