वेगाने जाणाऱ्या वाहनांवर बसणार अंकुश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 16:47 IST2019-10-05T16:28:06+5:302019-10-05T16:47:00+5:30
वेगाने गेल्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल..

वेगाने जाणाऱ्या वाहनांवर बसणार अंकुश
पुणे : राज्यातील महामार्गावरील तसेच शहरातील महत्वाच्या मार्गावरुन वेगाने गेल्याने होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेईकल देण्यात आले असून त्याद्वारे अशा वाहनांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे़. राज्यातील पोलिसांना सध्या ९६ अशी वाहने देण्यात येणार असून शनिवारी त्यातील काही वाहनांचे वितरण पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस आयुक्त डॉ़. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले़. यावेळी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, पोलीस बिनतारी संदेशचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधिक्षक विजय पाटील व मिलिंद मोहिते यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़.
यावेळी विनय कारगांवकर यांनी सांगितले की, महामार्गावरील प्राणघातक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय योजण्यात येत आहेत़. त्याचाच एक भाग म्हणून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन त्यांच्यात जनजागृती व्हावी, म्हणून इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करण्यात आली आहेत़. पहिल्या टप्प्यात ९६ वाहने राज्यभरातील पोलिसांना येत्या १० ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे़. यामुळे महामार्गावर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कारवाई केली जाणार आहे़.
डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले की, शहर पोलीस दलाला सध्या २ वाहने देण्यात आली असून आणखी दोन वाहने मिळणार आहेत़. शहरातील प्राणघातक अपघात कमी करण्याचा नागरिकांच्या सहकार्याने पोलीस प्रयत्न करीत आहेत़ त्यात आतापर्यंत ३३ टक्के प्राणघातक अपघात कमी झाले असून आमचे लक्ष्य ५० टक्के अपघात कमी करण्याचे आहे़.
़़़़़़़़़़़़