सतत ब्रेकचा वापर केल्याने निकामी; नवले पुलावर चालकांच्या चुकीने पण होतात अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:50 IST2025-11-14T10:47:05+5:302025-11-14T10:50:07+5:30
इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात व त्या भागांत सतत ब्रेकचा वापर केल्यामुळे ब्रेक निकामी होतात

सतत ब्रेकचा वापर केल्याने निकामी; नवले पुलावर चालकांच्या चुकीने पण होतात अपघात
पुणे : बंगळुरू - पुणेमहामार्गावर नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघात झाला. या जबरदस्त अपघातात काही क्षणांतच ७ जण जळून खाक झाले, तर तब्बल २० ते २२ जण जखमी झाले. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला. हे अपघात चालकांच्या चुकीने पण होत असल्याची माहिती समोर आली आहे.
कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान ८ कि. मी. रस्त्यावर उतार आहे. हा उतार आय.आर.सी.च्या मानकाप्रमाणे योग्य आहे. इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात व त्या भागांत सतत ब्रेकचा वापर केल्यामुळे ब्रेक निकामी होतात. त्यामुळे नियंत्रण सुटून अपघात होतात, असे एनएचएआयने म्हटले आहे.
नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक
गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता आणि नऱ्हे येथील महामार्गावर झालेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यामुळे निष्पापांचे बळी जात आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूककोंडी होत असून याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ओव्हरस्पीड वाहनांना दोन कोटींचा दंड
याच महामार्गावरील वाहतूक विभागाच्या वतीने इंटरसेप्टर वाहनाद्वारे एका वर्षाच्या कालावधीत एकूण ९ हजार ५८८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी ९६ लाख १ हजार पाचशे रुपये दंड ठोठावला आहे.