पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी
By राजू इनामदार | Updated: January 9, 2025 16:17 IST2025-01-09T16:17:27+5:302025-01-09T16:17:47+5:30
अजित पवारांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले.

पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी
पुणे: मेट्रोचे विस्तारित मार्ग, समान पाणी पुरवठा, नदीसुधार, सार्वजनिक वाहतूक असे रखडलेले विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या येत्या वार्षिक अंदाजपत्रकात पुणे शहरासाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पवार यांची गुरुवारी सकाळी सरकारी विश्रामगृहात शिष्टमंडळासह भेट घेतली व त्यांना या मागणीबाबतचे निवेदन दिले. पवार यांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले.
दत्ता बहिरट, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनवे, सुरेश कांबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. जोशी यांनी सांगितले की, शहरातील अनेक प्रकल्प आर्थिक मदतीअभावी रखडले आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून फक्त पुणे शहरासाठी म्हणून जवाहरलाल नेहरू एकात्मिक शहर विकास योजनेतून अडीच हजार कोटी रुपयांची तरतूद झाली. राज्य सरकारने ५०० कोटी रुपये दिले. या तीन हजार कोटी रुपयांमधून शहरातील अनेक प्रकल्प मार्गी लागले व विकास प्रक्रिया गतिमान झाली. त्यामुळे पुणे शहराचा चेहरा बदलला.
मागील काही वर्षांत मात्र समान पाणी पुरवठा योजना ५ वर्षे झाली तरीही अजून आहे तिथेच आहेत. नदीसुधार योजना निविदांमध्येच अडकली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी किमान एक हजार नव्या गाड्या घेण्याची गरज आहे. मेट्रोचे विस्तारित मार्ग अजूनही कागदावरच आहेत. या सर्व गोष्टी अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्या. निधी मिळाल्याशिवाय ही कामे मार्गी लागणे व शहराची विकासाची प्रक्रिया गतिमान होणे शक्य नाही. आता केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्या सरकारमध्ये तुम्ही अर्थमंत्री आहात. त्यामुळेच दोन्ही सरकारच्या वार्षिक अंदाजपत्रकात फक्त पुणे शहरासाठी म्हणून विशेष भरीव आर्थिक तरतूद करून घ्यावी, अशी मागणी पवार यांच्याकडे केली असल्याचे जोशी यांनी सांगितले.
पवार यांनी लगेचच पीएमपीएल व्यवस्थापकांना दूरध्वनी करून नव्या वाहनांच्या खरेदी प्रस्तावाविषयीची माहिती घेतली. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनाही त्यांनी दूरध्वनी केला व विस्तारित मार्गाच्या कामाविषयी विचारणा केली. आर्थिक तरतूद करून घेण्याविषयी त्यांनी आश्वासन दिले. शहर विकासाच्या कोणत्याही प्रश्नावर कसलेही राजकारण आणणार नाही तर कायमच बरोबर राहून काम करणार, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.