राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 01:16 PM2023-05-26T13:16:42+5:302023-05-26T13:17:07+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील मविआचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असताना काँग्रेसमधून तीव्र विरोध

Congress and Shiv Sena leaders suffering from NCP bullying Will mahavikas aghadi fight together in Pune | राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का?

राष्ट्रवादीच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेना नेते त्रस्त; पुण्यात 'मविआ' एकत्र लढणार का?

googlenewsNext

पुणे: कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कम करण्याच्या प्रयत्नाला वरिष्ठ नेते लागले आहेत, मात्र पुण्यात मविआमध्ये नेतृत्वावरून बऱ्याच कुरबुरी सुरू असल्याचे दिसते आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी सुरूच असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादागिरीने काँग्रेस व शिवसेनेचे नेतेही त्रस्त झाल्याचे दिसते आहे. जाहीरपणे मात्र भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूक मविआने एकत्रितपणे लढली. त्यात काँग्रेसला विजय मिळाला. त्यानंतर काँग्रेसने स्वतंत्रपणे कर्नाटक या शेजारच्याच राज्यात एकहाती सत्ता मिळवली. एकत्र राहिलो तर भाजपला महाराष्ट्रातही जोरदार प्रत्युत्तर देता येईल या विचाराने काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते राज्यस्तरावर नियोजन करत आहेत. इथे पुण्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील अन्य दोन्ही पक्षांवर दादागिरी करत आहे अशी टीका केली जाते. काँग्रेसमध्ये अतंर्गत संघर्ष अजूनही सुरूच आहे, तर राजकीय ताकदीचा अभाव असल्याने शिवसेनेला काही आवाजच राहिलेला नाही. त्यामुळे या आघाडीची एकतर जाहीर बिघाडी तरी होईल, किंवा मग तीनही पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालतील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होतो आहे.

काँग्रेसमध्ये पक्षाअंतर्गत बऱ्याच कुरबुरी आहेत. शहराध्यक्षपद गेले अनेक महिने प्रभारी आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला तयार नाही. त्यामुळे त्यांना स्वत:ची कार्यकारिणी निवडता येत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात काहीजण समाजमाध्यमांवर लिहित आहेत. त्यात ते कामच करत नाहीत, प्रदेश समितीने दिलेले उपक्रम राबवत नाहीत असे आक्षेप घेतले जातात. कसब्यात विजय मिळवल्यानंतरही आमदार रवींद्र धंगेकर यांना पक्षातील एक गट अजून स्वीकारायला तयार नाही. धंगेकर यांचे समर्थक त्यामुळे नाराज असतात.

राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यातील मविआचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असते. त्यांच्या या दादागिरीला काँग्रेसमधून तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादी व शिवसेना असे दोन्ही पक्ष प्रादेशिक आहेत, आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने नेतृत्व आमचेच असा त्यांचा दावा आहे, तर शहरात कोणतीही राजकीय ताकद नसताना त्यांना फार महत्त्व देऊन नुकसान करून घ्यायचे का असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही सगळे आलबेल नसून तिथेही आमदार समर्थक व शहराध्यक्ष समर्थक असे दोन गट झाल्याचे दिसते आहे.

शिवसेनेतील काही जणांनाही राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मान्य नसल्याची चर्चा आहे. सर्वांना समान दर्जा ठेवून चर्चा, बैठका व्हाव्यात, एकत्र असलो तरच राजकीय ताकद आहे हे लक्षात घ्यावे, त्यामुळे कोणाला जाहीरपणे किंवा खासगीतही कमी लेखू नये असे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संशय कायम

काँग्रेसभवनमध्ये नुकतीच मविआच्या पुण्यातील नेत्यांची बैठक झाली. तीनही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यात संयुक्त कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची सुरुवात म्हणून महापालिकेवर एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात आला. मात्र तरीही तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये परस्परांबद्दल संशय कायम आहे.

Web Title: Congress and Shiv Sena leaders suffering from NCP bullying Will mahavikas aghadi fight together in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.