नवरात्रोत्सवात नारळाचे दर तेजीत! दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ तरीही दररोज ३ लाख नारळांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:51 IST2025-09-25T17:51:35+5:302025-09-25T17:51:58+5:30
यंदा दक्षिणेकडील राज्यांत नारळाचे उत्पादन कमी झाल्याने गेल्या दोन महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत

नवरात्रोत्सवात नारळाचे दर तेजीत! दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ तरीही दररोज ३ लाख नारळांची विक्री
पुणे: नवरात्रोत्सवात शहरात व उपनगरात विविध देवी मंदिरात भाविकांकडून तोरण अर्पण केले जाते. तोरणासाठी नव्या नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत ३५ ते ५० रुपयांपर्यंत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात नारळाला उच्चांकी मागणी असते. गेल्या दोन महिन्यांपासून नारळाचे दर तेजीत आहेत. यंदा दक्षिणेकडील राज्यांत नारळाचे उत्पादन कमी झाल्याने दर तेजीत आहेत. नारळाच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून नवरात्रोत्सवात बाजारपेठेत दररोज तीन लाख नारळांची विक्री होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा दक्षिणेकडील राज्यात नारळाची लागवड कमी झाल्याने त्यात पावसामुळे नारळाचे प्रचंड नुकसान झाल्याने आवक घटली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत आवकही कमी होत आहे. त्यात नवरात्रीत उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी नारळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळाचे खोबरे गोड असते. त्यामुळे केटरिंग व्यावसायिक आणि उपाहारगृह चालकांकडून नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच प्रक्रिया उद्योगांकडून नारळाला मागणी वाढली आहे.
प्रकार नारळाचे दर (शेकडा)
नवा नारळ - ३००० ते ३२०० रुपये
मद्रास - ४८०० ते ५०००
सापसोल मोठा - ५४०० ते ५६०० रुपये
सापसोल मध्यम - ३२०० ते ३८०० रुपये
पालकोल - ३२०० ते ३४०० रुपये
नवरात्रोत्सवामुळे देशभरातून नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात दसरा, दिवाळीत पुन्हा खोब-यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे हे खोबऱ्याचे दर तेजीत राहाणार आहेत. सध्या नवरात्रोत्सवात पुणे शहर परिसरात दररोज तीन लाख नारळांची विक्री होते. नवीन नारळांचा हंगाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. त्यामुळे पुढील चार ते पाच महिने नारळाचे दर तेजीत राहणार आहेत. - दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केटयार्ड भुसार बाजार