भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:45 IST2025-11-22T12:44:30+5:302025-11-22T12:45:47+5:30
भोरमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विरुद्ध भाजपाचे संजय जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे

भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत
भोर : नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध भारतीय जनता पार्टी, अशी सरळ लढत होणार आहे. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत चार प्रभागांमध्ये सरळ लढत तर सहा प्रभागांत तिरंगी लढत होणार आहे. २० जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज राहिले आहेत. यात १२ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
भोर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या दोन अपक्ष उमेदवार जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्ष कविता खोपडे, अपक्ष नितीन सोनावले यांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विरुद्ध भाजपाचे संजय जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे. नगरसेवकपदासाठी नऊ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगरसेवकपदासाठी दहा प्रभागांतील २० जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.
भोर नगरपालिकेच्या प्रभाग, १ प्रभाग, ४ प्रभाग, ९ प्रभाग १०, यामध्ये दोन जागांसाठी चार याप्रमाणे सरळ लढत होणार आहे. तर प्रभात २ प्रभाग ३ प्रभाग ५, प्रभाग ६ प्रभाग ७, प्रभाग ८ मध्ये तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. यामुळे आता सर्वच उमेदवार आणि पक्ष व अपक्ष उमेदवार आपापल्या प्रचारात व्यस्त होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर सर्वच उमेदवार आणि पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू होणार आहे.