'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 18:42 IST2025-12-12T18:41:40+5:302025-12-12T18:42:39+5:30
महामार्ग उखडण्यासाठी जेसीबी लावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न
धायरी : पुणे-बंगळुरू महामार्गावरील 'मृत्युचा सापळा' ठरलेल्या नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी आज प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड दूर करण्यासाठी एक अत्यंत लक्षवेधी आणि आक्रमक महामृत्युंजय आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर कठोर ताशेरे ओढले आहेत.
प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे महामार्ग नव्हे तर चक्क 'यम’ बनलेल्या या रस्त्याला तोडण्यासाठी, आणि पर्यायाने अपघातांची शृंखला थांबवण्यासाठी, आंदोलक चक्क जेसीबी घेऊन आले होते. या जेसीबीला त्यांनी ‘वैकुंठ रथ’ असे नामकरण केले. हा ‘वैकुंठ रथ’ म्हणजेच‘यमाचा सापळा’ तोडण्यासाठी निघालेला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. नवले पूल परिसरात वारंवार निष्पाप नागरिकांचे बळी जात असतानाही, प्रशासन केवळ तात्पुरती मलमपट्टी करत आहे. कोणतेही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास हे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
स्थानिक नागरिकांनी स्वामी नारायण पूल ते नवले पूल या महत्त्वाच्या पट्ट्यात तातडीने उड्डाणपूल तयार करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे. प्रशासनाच्या कानठळ्या बसतील, अशा घोषणा देत आंदोलकांनी जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नावेळी परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी अनेक आंदोलकांनी प्रशासनाच्या या अमानवी वर्तनाचा निषेध करण्यासाठी स्वतःच्या हातात बेड्या बांधून घेतल्या होत्या आणि त्याच अवस्थेत ते शांतपणे आंदोलन करत होते. नागरिकांचा हा उद्रेक पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. यावेळी नेहा मोरे, राजाभाऊ जाधव, विठ्ठल सूर्यवंशी, भूषण मोरे, हरीश वैद्य, लतिफ शेख, प्रशिक दारुंडे, सुनील पढेर, सूरज दांगडे, सुशील भागवत, महेश घाडगे, सोनाली नायर, सोमनाथ शेडगे, संजय सुर्वे, अतिष चव्हाण, गणेश निंबाळकर, मयूर गवळी, समीर अळकुंटे, राहुल कोंडे, आनंद थेऊरकर, प्रफुल भराडी, शेकर लोंढे, अभिजित सावंत, रोहन जाधव, संकेत चाचूर्डे, निखिल ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक; कायमस्वरूपी तोडगा निघणार...
या आंदोलनानंतर १५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात यासंदर्भात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस, स्थानिक नागरिक आणि पत्रकार उपस्थित राहणार आहेत. बैठक समन्वयक सुभाष घंटे यांनी सांगितले की, “पहिल्यांदाच स्थानिक नागरिकांना आपले मुद्दे अधिकृतपणे मांडण्याची संधी दिली जाणार असून, त्यावर आधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. याशिवाय,१६ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आंदोलनकर्त्याबरोबर या विषयावर स्वतंत्र बैठक बोलावली आहे. एलिव्हेटेड रस्ता, सेवा रस्ता सुधारणा आणि सुरक्षा उपायांसाठी निर्णायक निर्णय अपेक्षित आहेत.