घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:36 IST2026-01-08T19:36:28+5:302026-01-08T19:36:52+5:30
या मोहिमे अंतर्गत २०२४ मध्ये पुणे विभागात ३१० मुलांची, तर २०२५ मध्ये ४२३ मुलांची घरवापसी करण्यात आली आहे

घर सोडून रेल्वे स्थानकावर पळून आलेल्या मुलांची घरवापसी; ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’मुळे ४२३ मुलांची सुटका
पुणे: रेल्वे स्थानकावर कोणत्या तरी वादामुळे, कौटुंबिक समस्या, चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात आलेल्या मुलांचा शोध आरपीएफ जवानांकडून घेतला जातो. त्यानंतर समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यासाठी समुपदेशन देतात. अशा पळून आलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी रेल्वेकडून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. याअंतर्गत २०२४ मध्ये पुणे विभागात ३१० मुलांची, तर २०२५ मध्ये ४२३ मुलांची घरवापसी करण्यात आली आहे.
रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे रेल्वे विभागात पळून आलेल्या मुलांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. २०२५ मध्ये एकूण १२३ मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच प्रवाशांचे हरवलेले सामान परत मिळविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत २०२५ मध्ये २३७ प्रवाशांना सुमारे ७४.५५ लाख रुपयांचे साहित्य सुरक्षितपणे परत करण्यात आले. महिला सुरक्षेसाठी राबविलेल्या ‘ऑपरेशन महिला सुरक्षा’ मोहिमेमुळे महिलांच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली असून, २०२५ मध्ये १,४७८ जणांवर कारवाई करून ५.४८ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
चोरीच्या ११८ प्रकरणे
पुणे रेल्वे स्थानकांवर चोवीस तास प्रवाशांची गर्दी असते. अनेक वेळा चोरीच्या घटना होतात. आरपीएफने वर्षभरात ‘ऑपरेशन पॅसेंजर सेफ्टी’ अंतर्गत २०२५ मध्ये ११८ प्रकरणे उघडकीस आणले असून, यामध्ये १४९ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत पुणे स्थानकासह इतर ठिकाणी १२ प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांसाठी ‘मेरी सहेली’ मोहिमेअंतर्गत ९६७ गाड्यांमध्ये २१ हजारांहून अधिक महिला प्रवाशांना मदत व मार्गदर्शन देण्यात आले. यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळत आहे.
महिला डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ’ऑपरेशन महिला सुरक्षा’ अंतर्गत महिलांच्या डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. २०२४ मध्ये ४१८ व्यक्तींवर खटला भरण्यात आले असून, त्यांच्याकडून ९१,२५० रुपये दंड वसूल करण्यात आले होते. तर २०२५ मध्ये, १ हजार ४७८ व्यक्तींवर खटला भरण्यात आले असून, ५ लाख ४८ हजार ८५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.