Pune: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू; डाॅक्टरांसह नर्स विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:22 IST2026-04-17T20:22:35+5:302026-04-17T20:22:57+5:30
मुलीला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते

Pune: वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू; डाॅक्टरांसह नर्स विरोधात गुन्हा दाखल
पुणे: बालकावर चुकीचे उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून नवी पेठेतील एका रुग्णालयातील डाॅक्टरांसह नर्स विरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डाॅ. मुकुंद संगमनेरकर, डाॅ. गणेश आरेकर, डाॅ. श्रीधर जाधव, डाॅ. राधा संगमनेरकर, तसेच नर्स मनीषा शिंदे आणि सारिका सुतार, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत हनुमान दत्ताराव गिते (वय ३४, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत गिते यांची मुलगी आदिती (वय ११ महिने) हिला उलटीचा त्रास होत असल्याने तिला मे २०२५ रोजी नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव डाॅक्टरांना होती. डाॅक्टर आणि नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप गिते यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता.
त्यानंतर हे प्रकरण चौकशीसाठी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवण्यात आले होते. या प्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने चौकशी केली. चौकशीत अकरा महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आले. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने नोंदवला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.