Chandrakant patil gave 100 marks out of 100 to pune mayor and Guardian Minister got failed | चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'

चंद्रकांतदादांनी पुण्याच्या महापौरांना दिले शंभरपैकी शंभर मार्क तर 'पालकमंत्र्यां'ना केले 'नापास'

ठळक मुद्देअर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने घेतले महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारची आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत

पुणे : कोरोना आपत्तीत पुणे शहरात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्या कामाला मी १०० पैकी १०० मार्क देतो असे सांगून पाटील यांनी, पालकमंत्री अजित पवार यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. पवार यांचा स्वभाव पाहता, कोरोना आपत्तीत त्यांनी खाड खाड निर्णय घेणे अपेक्षित होते पण तसे त्यांनी केले नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाची व कोरोना आपत्तीत केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.
 पाटील म्हणाले, कोरोनाच्या आपत्तीत देशामध्ये नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळेत लॉकडाऊन जाहीर केले. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी २०.९७ लाख कोटींचे पॅकेज दिले. महाराष्ट्र राज्याला १६०० कोटी केवळ मजुरांच्या योजनेसाठी दिले. पण महाराष्ट्र शासनाने काहीही केले नाही. केवळ रेल्वे तिकिटातील १५ टक्के रक्कम दिली. देशातील इतर राज्यांनी केंद्र सरकारचे पॅकेज येण्यापूर्वीच स्वत:चे कोरोना आपत्तीकरिता पॅकेज दिले, तसे महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीच केलेले नाही. 


देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव आहे. यावर बोलताना पाटील यांनी हा सर्व्हे कोणी केला हे पाहावे लागेल असे सांगून, आमचे ज्या राज्यात सरकार आहे तेथे व केंद्रात आम्हीच क्रमांक एकवर असल्याचे म्हणाले. 
देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले.
       

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Chandrakant patil gave 100 marks out of 100 to pune mayor and Guardian Minister got failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.