चाकण, राजगुरूनगरच्या कचऱ्याला बिरदवडीकरांचा विरोध
By Admin | Updated: September 22, 2014 05:31 IST2014-09-22T05:31:58+5:302014-09-22T05:31:58+5:30
दूषित पाणी प्यावे लागतेय, दुर्गंधी, माशा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटविला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत

चाकण, राजगुरूनगरच्या कचऱ्याला बिरदवडीकरांचा विरोध
आंबेठाण : दूषित पाणी प्यावे लागतेय, दुर्गंधी, माशा आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे दररोज दवाखाना करावा लागत आहे. कचरा पेटविला की धुरामुळे श्वसनाचे आजार जडत आहेत, अशा अनेक तक्रारी करीत बिरदवडी ( ता.खेड ) येथील ग्रामस्थांनी चाकण आणि राजगुरुनगर येथून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून माघारी पाठविल्या.
पुन्हा या ठिकाणी गाड्या आणल्या तर हिंसक आंदोलन करू असा इशाराही वाहनचालकांना दिला. बिरदवडी (ता.खेड) गावाच्या दक्षिणेला परंतु खराबवाडी गावाच्या हद्दीत उंचावर मोठी खाण आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी चाकण आणि राजगुरुनगर ग्रामपंचायतीचा दररोजचा कचरा या ठिकाणी टाकला जातो.
गावातील जवळपास १५० युवकांनी एकत्र येऊन आज या कचऱ्याच्या गाड्या अडविल्या.
चाकण येथून २ टेम्पो, २ ट्रॅक्टर, आणि एक लहान रिक्षा अशा पाच गाड्या दररोज २-२ वेळा कचरा टाकतात. राक्षेवाडी येथील एक दिवसाआड एक टेम्पो कचरा आणि राजगुरुनगर येथून १ टेम्पो आणि १ ट्रॅक्टर कचरा दररोज टाकला जातो.
येथे कचऱ्याचे मोठमोठे ढीग
जमा झाले आहेत. यापैकी काही कचरा खाणीत पडत असून, खाणीतील पाणी किंवा पावसाने येणारे पाणी या ठिकाणी कचऱ्यात मुरत असल्याने ते दूषित होत आहे. ते पाणी उताराच्या दिशेने म्हणजेच बिरदवडी (ता.खेड) गावाच्या दिशेने निचरा होत आहे. दूषित पाणी निचरा होत असल्याने बिरदवडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या ठिकाणी असणाऱ्या पवार वस्ती, काळडोके वस्ती, फडके वस्ती या ठिकाणावरील ग्रामस्थ त्रस्त झाले असून दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजार जडत आहेत.
येथून जवळूनच चाकण-
वांद्रा रस्ता आहे. या धुराच्या वासामुळे या रस्त्याने प्रवास करणेदेखील मुश्कील झाले आहे. कचऱ्याच्या ढिगावर भटकी कुत्री फिरकत असल्याने या ठिकाणाहून
प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
या आंदोलनप्रसंगी
मराठा महासंघाच्या आशा काळडोके, सुभाष पवार, नवनाथ चौधरी, भागाजी पवार, अमोल परदेशी, रामदास फडके, शैलेश फडके, राजेंद्र कारके, विजय पवार, ओमकार पवार, युवराज पवार, सुनील काळडोके, सोमनाथ काळडोके, विजय चव्हाण, राहुल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)