१ लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:22 IST2025-11-26T15:21:33+5:302025-11-26T15:22:07+5:30
तुमच्या दुकानातील मसाला काजुमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची

१ लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे - मिठाईच्या दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ यु ट्युबवर टाकून तो डिलिट करण्यासाठी १ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तोतया यु ट्युब पत्रकारासह चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
राहुल मच्छिद्र हरपळे (रा. फुरसुंगी) माऊली चव्हाण (रा. फुरसुंगी) आणि त्यांचे इतर दोन साथीदार अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत खिमसिंह ओमसिंह राजपुरोहित (४२, रा. राधाकृष्ण कॉम्प्लेक्स, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल हरपळे हा यु ट्युब चॅनेलचा पत्रकार म्हणून वावरतो. हरपाळे हा १७ नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांच्या भेकराईनगर येथील स्वीट मार्टमध्ये आला. तो म्हणाला, तुमच्या दुकानातील मसाला काजुमध्ये आळ्या असल्याबाबतचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकून तुमची बदनामी करतो, तसे करायचे नसेल तर मला ५० हजार रुपये द्या, अशी खंडणी मागितली. त्यानंतर तुमच्या दुकानाचा व्हिडीओ प्रसारीत केला असून तो डीलीट करण्यासाठी १ लाख रुपयाची खंडणी मागितली. त्याला माऊली चव्हाण व इतर दोघांनी साथ दिली. याबाबत राज पुरोहीत यांनी हरपळे याची माहिती काढल्यानंतर तो अशाच प्रकारे खंडणी उकळण्याचे काम करत असल्याचे व त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात हरपळे, चव्हाण व इतर दोघांच्या विरोधात खंडणी मागितल्याची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख अधिक तपास करीत आहेत.