हाताला मलमपट्टी करण्याचा बहाणा; परिचारिकेशी अश्लील कृत्य, डाॅक्टरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:31 IST2025-12-01T15:31:00+5:302025-12-01T15:31:16+5:30
काम करताना तरुणीच्या हाताला जखम झाल्याने डाॅक्टरने परिचारिकेला केबिनमध्ये बोलवले

हाताला मलमपट्टी करण्याचा बहाणा; परिचारिकेशी अश्लील कृत्य, डाॅक्टरविरोधात गुन्हा दाखल
पुणे : परिचारिकेशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका डाॅक्टरविरोधात आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ४८ वर्षीय डाॅक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी परिचारिका आहे. जांभुळवाडी रस्त्यावर असलेल्या एका दवाखान्यात ती काम करते. शनिवारी (दि. २९) ती नेहमीप्रमाणे सकाळी दवाखान्यात आली. काम करताना तिच्या हाताला जखम झाली. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास डाॅक्टरने परिचारिकेला केबिनमध्ये बोलवले. तरुणीच्या हाताला मलमपट्टी करण्याचा बहाण्याने डाॅक्टरने तिच्याशी अश्लील कृत्य केले. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दोडमिसे करत आहेत.
क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून दोघांना मारहाण
क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने दहशत माजवून दोघांना मारहाण केल्याची घटना गणेश पेठ परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत अनिल मोतीलाल कल्याणकर (४८, रा. श्री स्वामी समर्थ काॅम्प्लेक्स, दूधभट्टीसमोर, गणेश पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणकर यांचा मुलगा आणि चुलत नातू हे रविवारी (दि. ३०) दुपारी तीनच्या सुमारास क्रिकेट खेळून घराजवळ थांबले होते. क्रिकेट खेळताना त्यांचा काही जणांशी वाद झाला होता. या घटनेनंतर आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी कल्याणकर यांचा मुलगा आणि नातवाला शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत दोघे जखमी झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जहाळे करत आहेत.