Brother fell into expensive, video went viral directly to jail who cut cake with sword | भाईचा बड्डे पडला महागात, व्हिडीओ व्हायरल होताच भाई थेट तुरुंगात

भाईचा बड्डे पडला महागात, व्हिडीओ व्हायरल होताच भाई थेट तुरुंगात

पुणे - विमाननगर-"भाईचा बड्डे.... आणि तलवार नाय..... असे शक्यच नाही. "येरवड्यातील एका नवोदित भाईने तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने या नवोदित भाईला तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणी आशिष अशोक परदेशी (वय २४, रा.शहादलबाबा दर्ग्याजवळ, येरवडा) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. येरवड्यातील सराईत आरोपी आशिष परदेशी याचा ११ मार्च रोजी वाढदिवस होता. त्याने भर रस्त्यावर मध्यरात्री दोन्ही हातात तलवारी घेत केक कापला होता. भाईच्या या तलवारीच्या वाढदिवसाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तात्काळ  या भाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.  

आशिष परदेशी याला बुधवार (दि.१८ )रोजी चामुंडा माता मंदिर येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलीस हवालदार गणेश साळुंके,पोलिस कर्मचारी राकेश खुनवे, सागर घोरपडे,  राठोड यांच्या पथकाने सापळा रचून तलवारीसह ताब्यात घेतले.  त्याच्यावर आर्म ऍक्टनुसार  कारवाई करत गुन्हा दाखल करून अटक केली. आशिष परदेशी याच्यावर येरवडा पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चौधरी ,पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारच्या पथकाने हि कारवाई केली. दरम्यान, येरवड्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नवीन भाई तलवारी, व धारधार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करत आहेत. आता तर गुन्हेगारांनी हद्द ओलांडून हातात तलवारी घेऊन रस्त्यात वाढदिवसाच्या केक कापायला सुरवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा भाईंना  पोलिसांनी कारवाई करून जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. 

Web Title: Brother fell into expensive, video went viral directly to jail who cut cake with sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.