मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 20:06 IST2025-07-16T20:06:50+5:302025-07-16T20:06:58+5:30

स्वत:चे असे कायकर्तेच नसल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसकडे उधार उसनवारी करत आहे

BJP came to power by stealing voters' votes; Harshvardhan strongly criticizes Sapkal | मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका

पुणे: राज्याची कायदा सुव्यवस्था घाशीराम कोतवालाकडे आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. स्वत:चे असे कायकर्तेच नसल्याने भारतीय जनता पक्ष काँग्रेसकडे उधार उसनवारी करत आहे असे ते म्हणाले. धाक दाखवून पक्षप्रवेश केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसभवनमध्ये बुधवारी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्याआधी पत्रकारांबरोबर बोलताना सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मतदारांच्या मताची चोरी करून भाजप सत्तेत बसला आहे. ते त्यांच्या नेत्यांनाही मोठे करत नाही. त्यासाठी काँग्रेसमधील नेते पक्षात आयात करतात.

पक्षाने ज्यांना मुख्यमंत्रीपद दिले तेही भाजपत गेले, तिथे एका जिल्हाध्यक्षांची काय कथा अशी प्रतिक्रिया व्यक्त करून सपकाळ म्हणाले, जाणाऱ्यांना थांबवता येत नाही. ते त्यांच्या संस्था वाचवण्यासाठी गेले. पक्षाकडून सर्व काही घेतल्यानंतरही स्वार्थ साधण्यासाठी कोणी पक्षातून बाहेर पडत असेल तर त्याला संधीसाधूपणा म्हणतात. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. आमच्याकडे वैचारिक भूमिका आहे. हा नेत्यांचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असे सपकाळ म्हणाले.

पक्ष कार्यकर्त्यांच्या काँग्रेसभवमधील मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. प्रदेश उपाध्यक्ष देवीदास भन्साळी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, श्रीरंग गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्यासह अनेक आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेते पक्ष सोडून गेल्यानंतर कार्यकर्त्यांनीच पक्ष टिकवला, वाढवला आहे. काँग्रेस हा समुद्र आहे, त्यातून चारदोन जण केले म्हणून काहीही होत नाही. मात्र पक्षाने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच संधी द्यायला हवी असे मत बहुसंख्य वक्त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षपदावरून बोलताना सपकाळ म्हणाले, “पक्षाच्या वाईट काळात पक्षाबरोबर राहणाऱ्यांच्या पाठीशी पक्ष नक्की उभा राहिल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघ निहाय आराखडा तयार करावा. आघाडीतून लढायचे की स्वबळावर याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. हा निर्णय घेताना तळातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना विचारात घेतल्या जातील.”

जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा निर्णय तातडीने घेतला जाईल. त्यासाठी येत्या काही दिवसातच निरीक्षक पाठवू. ते जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करतील. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ असे सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: BJP came to power by stealing voters' votes; Harshvardhan strongly criticizes Sapkal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.