दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, नवले पुलाजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 17:36 IST2025-10-17T17:35:53+5:302025-10-17T17:36:12+5:30
पादचारी रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटून ती पादचाऱ्याला धडकली, या घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला

दुचाकी घसरून पादचाऱ्याला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, नवले पुलाजवळ अपघात
पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ दुचाकी घसरून दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दुचाकी घसरल्याने रस्ता ओलांडणारा पादचारी धडकेत जखमी झाला. मेघनारायण प्रल्हाद शिंदे (६२, रा संतोषनगर, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात पादचारी गणेश कोडीतकर (५०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हे जखमी झाले. कोडितकर यांनी याबाबत आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश कोडीतकर हे गुुरुवारी (दि. १६) सकाळी साडेपाचच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. कोडितकर हे पॅनोरमा सोसायटीसमोरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी समोरून भरधाव आलेले दुचाकीस्वार शिंदे यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. कोडितकर यांना दुचाकीने धडक दिली. दुचाकी घसरल्याने मेघनारायण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोडितकर आणि मेघनारायण यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दुचाकीस्वार मेघनारायण यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस कर्मचारी कांबळे करत आहेत.