नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 20:38 IST2025-11-13T20:37:04+5:302025-11-13T20:38:19+5:30
साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर भुमकर पुलाजवळील कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली.

नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
पुणे - नवले पुलावर आज गुरुवारी (दि. १ ३ ) सायंकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे सात ते आठ वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातात सुमारे पंधरा ते वीस वाहनांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 13, 2025
या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये…
अधिकच्या माहितीनुसार, साताऱ्याकडून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावर भुमकर पुलाजवळील कंटेनरने अचानक नियंत्रण सुटल्याने पुढील वाहनांना धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हलर बस पलटी झाली असून, त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. सुदैवाने बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र पुढे असलेल्या एका सीएनजी कारला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने ती कार दोन कंटेनरमध्ये अडकली. धडकेनंतर कारला पेट लागला आणि काही क्षणांतच आगीने भयंकर रूप धारण केले. कारमध्ये एक कुटुंब अडकल्याची माहिती मिळाली असून, त्यामध्ये दोन पुरुष, एक महिला आणि सुमारे चार ते पाच वर्षांचे एक लहान मूल असा चौघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच कंटेनरमधील चालक व क्लीनर यांचाही यात मृत्यू झाल्याचे समजते.
नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू#pune#firepic.twitter.com/o937Etwd2k
— Lokmat (@lokmat) November 13, 2025
या दुर्घटनेनंतर पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझवण्याचे आणि बचावकार्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. पोलिसांनी परिसरातील वाहतूक वळवून नागरिकांना त्या मार्गावरून जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अपघाताचे नेमके कारण समोर येण्यासाठी पोलिस तपास सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक फेल होणे किंवा नियंत्रण सुटणे हे कारण असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.