Bhigwan Kidnap: भिगवणमधून पळाल्यानंतर 'ती' तरुणी दोन-तीन दिवस कुठे होती, आता पुढे काय करणार आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:26 IST2026-02-20T15:24:25+5:302026-02-20T15:26:31+5:30
Bhigwan Kidnap News: भिगवण येथे घडलेल्या अपहरण प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले. तरुणीनेच समोर येत पोलिसांना अपहरण नसल्याचे शपथपत्रावर लिहून दिले.

Bhigwan Kidnap: भिगवणमधून पळाल्यानंतर 'ती' तरुणी दोन-तीन दिवस कुठे होती, आता पुढे काय करणार आहे?
घरच्यांनी २२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या तरुणासोबत लग्न निश्चित केले. लग्नाच्या खरेदीसाठी आई आणि भावासोबत गेल्यानंतर तरुणी प्रियकरासोबत पळून गेली. पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये घडलेल्या या घटनेनंतर कुटुंबीयांनी तिचे अपहरण केल्याचा आरोप केला. तर तरुणीने मात्र स्वतःच्या मर्जीने प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगितले. १७ फेब्रुवारी रोजी भिगवणमधून फरार झाल्यानंतर तरुणी २० फेब्रुवारी रोजी बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली. दोन दिवस ती पुणे, सातारा, अहिल्यानगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होती.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
भिगवणमधून तरुणी तिचा प्रियकर जहीर शेख याच्यासोबत पळून गेली. १७ फेब्रुवारी रोजी पळून गेल्यानंतर भिगवणवरून ते अहिल्यानगरमधील बाहेरच्या बायपासने पुणे रोडने हडपसरला आले होते. त्यानंतर सासवड मार्गे जाऊन सातारा जिल्ह्यातील वाठार येथील बसस्टॉप जवळ थांबले होते.
अहिल्यानगर, पुणे आणि सातारा
मुलगी आणि मुलगी भिगवणमधून पळून गेल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे, सासवड अशा शहरात फिरले. त्यानंतर ते महाबळेश्वरला गेले होते. महाबळेश्वरवरूनच तरुणी आणि तरुण मध्यरात्री दीड वाजता बारामती शहरात पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला.
रात्री पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता पोलीस तरुणाला खासगी गाडीतून वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले होते.
भावाला कॉल केला आणि म्हणाली मी जहीरसोबत चाललेय
भिगवणमधून निघाल्यानंतर काही वेळाने तरुणीने तिच्या भावाला जहीरच्या मोबाईलवरून कॉल केला होता. "मी जहीरबरोबर जात आहे. त्याच्याबरोबर १ वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत, याची कल्पना या अगोदरही मी तुम्हाला दिलेली होती", असे तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.
पुढचे आयुष्य जहीरसोबतच राहणार
"अपहरण आणि मिरचीपूड फेकल्याची, तसेच अंगठी आणि नथ हिसकावल्याची तक्रार माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्या तरी दबावावरून खोटी व बनावट स्वरुपाची दिलेली आहे. या पुढील आयुष्य मी जहीरसोबतच राहणार आहे. त्याबाबत इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये. मी पूर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत", असेही तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.