भिगवण प्रकरणात डोळ्यात तिखट टाकल्याचा दावा खोटा? मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:19 IST2026-02-20T13:15:53+5:302026-02-20T13:19:03+5:30
- संबंधित तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली आणि तिने शपथपत्र देत ‘अपहरण’चा आरोप फेटाळला आहे.

भिगवण प्रकरणात डोळ्यात तिखट टाकल्याचा दावा खोटा? मेडिकल रिपोर्टचा धक्कादायक खुलासा
भिगवण (पुणे जि.) - भिगवण परिसरातील तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. लग्नाच्या खरेदीसाठी गेलेल्या तरुणीला आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. मात्र संबंधित तरुणी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली आणि तिने शपथपत्र देत ‘अपहरण’चा आरोप फेटाळला आहे.
अशात मेडिकल रिपोर्ट समोर आला असून, त्यामध्ये आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरचीपूड नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र तक्रारीत आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकल्याचा उल्लेख होता. मात्र मेडिकल रिपोर्टमध्ये डोळ्यांत मिरचीपूडचे कोणतेही चिन्ह नसल्याचे समोर आले. त्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. .
पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीने आपण स्वतःच्या इच्छेने एका तरुणासोबत गेल्याचे सांगितले. त्यामुळे ‘अपहरण’चा मुद्दा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना इंदापूर तालुका परिसरातील असल्याने स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, तरुणीच्या भावाने माध्यमांशी बोलताना वेगळी बाजू मांडली. आम्हाला मारहाण करून डोळ्यात मिरचीपूड टाकली आणि बहिणीला जबरदस्तीने घेऊन गेले. ती स्वतःहून गेलेली नाही असा आरोप त्याने केला. मुलगी परत मिळावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
पोलिस तपास सुरू
दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीच्या शपथपत्राची पडताळणी, कुटुंबीयांच्या आरोपांची चौकशी आणि घटनेची खरी पार्श्वभूमी शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.