दिवसातून ३ वेळा शाळेत घेणार हजेरी; अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 17:24 IST2025-05-16T17:22:19+5:302025-05-16T17:24:12+5:30

शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसांतून तीन वेळा घेतली जाणार असून, त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार

Attendance will be taken at school 3 times a day parents will be notified immediately by SMS in case of absence | दिवसातून ३ वेळा शाळेत घेणार हजेरी; अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’

दिवसातून ३ वेळा शाळेत घेणार हजेरी; अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’

पुणे : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जारी केल्या आहेत. याअंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसांतून तीन वेळा घेतली जाणार असून, त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारसींनुसार सकाळी, दुपारी व संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल. अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जाईल, अशी प्रकारे दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच खासगी शाळांमध्ये वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने व स्वच्छतागृहाबाहेर कॅमेरे लावणे बंधनकारक असून एक महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवणे. सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिचर नेमणे, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमणे, अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश थांबविण्यासाठी दक्षता बाळगणे, १०९८ क्रमांक दृश्यमान ठिकाणी लावणे आणि त्यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना देणे, शाळेच्या भिंतींवर सुरक्षेविषयी माहिती देणारे फलक, चित्रे किंवा डिजिटल बोर्ड लावावेत. विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येऊ नये म्हणून समुपदेशकाची नियुक्ती करावी. खासगी शाळांनी पात्र व अनुभवी समुपदेशक नियुक्त करणे, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये ‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श’ यासंबंधी प्रात्यक्षिके आयोजित करावी.

शाळा प्रशासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर नियमित बैठक घेऊन या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करावी, नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या स्पष्ट सूचना शालेय शिक्षण विभागाने परिपत्रात दिल्या आहेत.

Web Title: Attendance will be taken at school 3 times a day parents will be notified immediately by SMS in case of absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.