लोणी काळभोरमध्ये पेटवून घेत तिघांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 19:03 IST2021-10-13T18:32:41+5:302021-10-13T19:03:32+5:30
लोणी काळभोर : कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून त्यातील तिघांनी स्वतःच्या अंगावर ...

लोणी काळभोरमध्ये पेटवून घेत तिघांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
लोणी काळभोर: कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे जमाव जमवून त्यातील तिघांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी अटकाव केला असता, त्यांना धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घडला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष मारुती होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर तानाजी धायगुडे (वय २३), संतोष सुरेश माळी (वय ३०), रतन तानाजी धायगुडे (वय ५२), दुर्गेश तानाजी धायगुडे (वय २५), नागेश चंद्रकांत वाघमारे (वय २५) शुभम सुदाम विरकर (वय २०), संगीता शिवाजी धायगुडे (वय ४८) व अंजना मारुती धायगुडे (वय ५८) (सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) या आठजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार मंगळवार (१२ ऑक्टोबर) रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
यातील गुन्हा दाखल झालेले आठजण हे पोलीस ठाण्याचे आवारात अचानकपणे आले व आमच्यावर कारवाई कशी करता, असे म्हणत मोठमोठ्याने आरडाओरडा केला. यावेळी घोषणा देऊन दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी याबाबत विचारले असता, त्यापैकी एकाने ‘तुम्ही माझ्याविरोधात तक्रार कशी दाखल करुन घेतली. तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता बघू. मी तुम्हाला बघून घेतो’, असे म्हणून प्लास्टिकच्या बाटलीमधून आणलेले डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. ‘काडेपेटी आणून दे, मी आत्ता पेटवून घेऊन जीव देतो, तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता ते बघून घेतो’, असे म्हणाला.
यावेळी त्याच्यासोबत असलेल्याला ‘तू अंगावर डिझेल ओतून घे, काय आहे ते मी बघून घेतो’, असे म्हटल्याने दुसऱ्या व्यक्तीनेही बाटलीमधील डिझेल अंगावर ओतून घेतले. त्याला बघून त्यांच्यासोबत असणाऱ्या महिलेनेही डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून काडेपेटी दे, असे म्हणून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, निकेतन निंबाळकर, संतोष होले, महिला पोलीस हवालदार वैशाली निकंबे व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, उलट या व्यक्तींनी पोलिसांनाच धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.